अभय कुमार

जगभर फिरून आल्यानंतरच आपल्या जन्मभूमीचे खरे महत्त्व कळते.

जगभर फिरून आल्यानंतरच आपल्या जन्मभूमीचे खरे महत्त्व कळते. राजनैतिक अधिकारी व कवी अभय कु मार यांनी अनेक देशांमध्ये काम केल्यानंतर घेतलेला हा अनुभव. त्यांची ओळख राजनैतिक अधिकारी म्हणून फारशी नसली तरी कवी म्हणून नक्कीच आहे. नुकतेच त्यांच्या कवितांचे वॉशिंग्टन डीसी येथे ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय कवी. ‘दी पोएट्री अ‍ॅण्ड पोएट’ मालिकेत त्यांच्या या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. या ध्वनिमुद्रणात आतापर्यंत १९९७ पासून रॉबर्ट हास, रिचर्ड ब्लांको, इव्हान बोलॅण्ड, बिली कॉलिन्स, रिटा डव्ह, लुईस ग्लक, डोनल हॉल, टेरान्स हेस, टेड कुसर, फिलीप लीव्हाइन, व्ही.एस मेरविन, नोमी शिहाबा ने, रॉबर्ट पिनस्की, चार्ल्स सिमिक, नताशा ट्रेथवे, मोनका युन, ट्रॅसी स्मिथ यांच्या कवितांचा समावेश झाला आहे.

अभयकु मार यांची अलीकडची वॉशिंग्टन भेट गाजली, ती तेथील ‘बसबॉइज’ या पुस्तकांच्या दुकानात झालेल्या काव्यवाचनाने. तेथे इंद्रन, अमृतनायगम, सिमॉन शुचॅट यांच्यासमवेत त्यांनी काव्यवाचन केले. त्यांच्या कवितांचा समावेश किमान साठ आंतरराष्ट्रीय साहित्य नियतकालिकांत झाला आहे. ‘द सिडक्शन ऑफ दिल्ली’ (२०१४), ‘द एट आइड लॉर्ड ऑफ काठमांडू ’ (२०१७),‘ द प्रॉफेसी ऑफ ब्राझिलिया’ (२०१८)  हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘अर्थ अँथेम’ हे त्यांचे काव्यगीत तीस भाषांत अनुवादित झाले असून ‘नॅशनल थिएटर ऑफ ब्राझिलिया’ या संस्थेने त्याची संगीतमय रचना तयार केली. त्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमणियम यांनी संगीत दिले असून कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे. ‘कॅपिटल्स अ‍ॅण्ड १०० ग्रेट इंडियन पोएट्स’ या पुस्तकाचे ते संपादक आहेत. २०१३ मध्ये त्यांना सार्कचा साहित्य पुरस्कार मिळाला. ‘पोएट्री साल्झबर्ग रिव्हय़ू’, ‘आशिया लिटररी रिव्हय़ू’ या नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.

अभयकुमार हे मूळ बिहारचे. १९८० मध्ये नालंदा जिल्हय़ात एका लहानशा खेडय़ात जन्मलेला प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा जेव्हा दिल्लीत आला तेव्हा तेथील संस्कृती त्याच्यासाठी वेगळी होती.  इंग्रजीचा गंध नव्हता, पण दोन वर्षांत त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. पदवीसाठी त्यांनी भूगोलाचा अभ्यास केला, पण नंतर ते साहित्याकडे वळले. वयाच्या विशीत त्यांनी ‘रिव्हर व्हॅली टू सिलिकॉन व्हॅली-स्टोरी ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ अ‍ॅन इंडियन फॅमिली’ हे आठवणीपर पुस्तक लिहिले. मध्यमवर्गीय कुटुंबाचा सगळा जीवनपट यातून सामोरा येतो. परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक थेट मॉस्कोत झाली. ते नुसते लेखकच नाहीत तर चित्रकारही आहेत. सेंट पीट्सबर्ग, नवी दिल्ली, पॅरिस येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. मगाही, हिंदी, इंग्रजी, रशियन, नेपाळी  या भाषा त्यांना येतात. संस्कृत, स्पॅनिश भाषा चांगल्या समजतात, त्याचा फायदा त्यांना वैचारिक संपन्नता वाढवण्यासाठी झाला. सध्या ते ब्राझीलमध्ये राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांनी परराष्ट्र सेवेच्या माध्यमातून देशोदेशीच्या कवींना वेगळ्या माध्यमांतून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘वुई आर हय़ूमन्स, द अर्थ इज अवर होम’ या त्यांच्या पृथ्वीगीताचे अंतिम वाक्य जागतिकीकरणानंतर जगाशी आपल्या बदललेल्या नात्याची अनुभूती देते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhay kumar

ताज्या बातम्या