लष्करी सेवा जितकी खडतर, तितकीच प्रतिष्ठेची. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजतागायत या सेवेकडे पश्चिम महाराष्ट्रातील युवकांचा ओढा राहिला आहे. या रांगडय़ा मातीचा गुणधर्म काही वेगळाच. याच मातीशी नाळ जोडलेले एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (निवृत्त) यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बस्तवडे हे त्यांचे मूळ गाव. हवाई दलात विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या भोसले यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या आयोगात होणार आहे. १५ फेब्रुवारी १९५७ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील कृषी विभागात असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण भ्रमंती करीतच झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी नाशिकच्या भोसला सैनिकी विद्यालयातून पूर्ण केले. म्हणजे ते ‘रामदंडी’. याच शाळेतून त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. घोडेस्वारी, नेमबाजी या प्रकारांत नैपुण्य मिळविताना ते अभ्यासात नेहमी अव्वल राहिले. यामुळे सवरेत्कृष्ट विद्यार्थ्यांचा किताबही त्यांनी पटकावला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि लष्करी सेवेत जाण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे फलित म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाले. हे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ८ जून १९७८ रोजी त्यांची हवाई दलाच्या उड्डाण (दिशादर्शन) शाखेत नेमणूक झाली.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Fire at Ichalkaranji Loom Factory
इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यास आग; १ कोटींचे नुकसान

डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असणाऱ्या भोसले यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून एम. एस्सी. तर कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतले. सेवा काळात त्यांनी जपानमधील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्समधून एम. फिल.ची पदवी मिळविली. हवाई दलातील ३९ वर्षांच्या सेवाकाळात आघाडीवरील तळ आणि कार्यालयीन व्यवस्थेतील विविध पदांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. हवाई मोहिमांमध्ये सहभाग, भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, हेरगिरी रोखणे, प्रशिक्षण संस्थांची क्षमतावाढ, लष्करी जवान-स्थानिक नागरिक संबंधांचे व्यवस्थापन, सायबर सुरक्षितता व हवाई उड्डाणातील सुरक्षितता अशा नानाविध विषयांवर त्यांनी काम केले. पुण्याच्या हवाई दल केंद्राचे मुख्य व्यवस्थापक, नवी दिल्लीच्या हवाई दलाच्या मुख्यालयात गुप्तचर विभागाच्या प्रमुख व्यवस्थापकाची धुरा त्यांनी सांभाळली. तब्बल पाच हजार २०० तास उड्डाणाचा अनुभव असणारे भोसले प्रथम श्रेणीतील प्रमाणित दिशादर्शन प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. गांधीनगरच्या दक्षिण-पश्चिम मुख्यालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. हवाई दलाच्या देशातील व देशाबाहेरील मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने २००५ मध्ये विशिष्ट सेवा पदकाने तर २०१० मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने भोसले यांना सन्मानित केले.

आजवर स्वीकारलेली प्रत्येक जबाबदारी भोसले यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची जबाबदारी ते तितक्याच सक्षमपणे पार पाडून राष्ट्रउभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, हे निश्चित.