बालगोपाळांपासून सगळ्यांनाच खिळवून ठेवणारे अ‍ॅनिमेशनपट (सचेतपट) हे आजच्या काळात नावीन्याचा विषय राहिलेले नाहीत. त्यांची संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली ती वयाच्या १११ व्या वर्षी नुकत्याच निवर्तलेल्या रुथी थॉमसन यांनी. जगण्यावर प्रेम करणाऱ्या रुथी त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळेच दीर्घायुषी ठरल्या. इलस्ट्रेटर व स्टोरीबोर्ड टेलर यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी ४० वर्षे दी वॉल्ट डिस्ने कंपनीत काम केले. त्या काळात डिस्नेचा दरारा होतात. या कंपनीने केलेल्या अनेक नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये रुथी यांचा सहभाग होता. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दी रेस्क्यूअर्स’चे काम पूर्ण करून १९७५ मध्ये त्या निवृत्त झाल्या. इंटरनॅशनल फोटोग्राफर्स युनियनने निमंत्रित केलेल्या पहिल्या तीन महिलांमध्ये त्यांचा समावेश होता. दी वॉल्ट डिस्ने कंपनीने त्यांचा डिस्ने लिजंड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. पोर्टलॅण्डमधील माइने येथे २२ जुलै १९१० रोजी जन्मलेल्या रुथी बोस्टनमध्ये लहानाच्या मोठय़ा झाल्या. १९१८ मध्ये त्यांचे कुटुंबीय कॅलिफोर्नियात आले. ते ओकलॅण्डमध्ये आले तो काळ पहिल्या महायुद्धाच्या अखेरीचा होता. स्टुडिओ कर्मचारी म्हणून काम करण्याआधीपासून थॉमसन यांचा डिस्ने कंपनीशी संबंध होता. डिस्ने ब्रदर्सपासून जवळच असलेल्या हॉलीवूडमध्येही वावरण्याची त्यांना संधी मिळाली. नंतर त्यांनी काही काळ काटरून स्टुडिओत काम केले. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सॅन फर्नाडो व्हॅलीत डबरॉक रायडिंग अकादमीत काम सुरू केले. तेथे वॉल्ट डिस्ने पोलो खेळत असत. त्यांनी थॉमसन यांना शाई व रंगाच्या मदतीने रंगकारी करण्याचे काम दिले. तेथे तयार होणाऱ्या अ‍ॅनिमेशनपटांवर अंतिम हात फिरवून त्यांना सुबक दर्जा प्राप्त करून देण्याचे काम त्या करीत असत. ‘स्नो व्हाइट अ‍ॅण्ड सेव्हन ड्वार्फ’ (१९३७) हा त्यांचा पूर्ण लांबीचा पहिला अ‍ॅनिमेशनपट. नंतर थॉमसन यांची अ‍ॅनिमेशनपटाची अंतिम तपासणीच्या तसेच दृश्य नियोजनाच्या कामासाठी नियुक्ती झाली. कॅमेरा व इतर अनेक अंगांचे त्यांचे ज्ञान अजोड होते. डिस्ने फिचर्सच्या ‘पिनोशियो’, ‘फॅण्टासिया’, ‘डम्बो’, ‘स्लीपिंग ब्युटी’, ‘मेरी पॉपिन्स’, ‘दी अ‍ॅरिस्टोकॅटस’, ‘रॉबिन हूड’, ‘अ‍ॅलीस इन वंडरलॅण्ड’, ‘दी जंगल बुक’ या अ‍ॅनिमेशनपटांसाठी त्यांनी काम केले. मिकी माऊस आणि मी बरोबरच वाढलो, असे त्या गमतीने म्हणत. अ‍ॅनिमेशनपटात कुठलीही कामे करण्यासाठी लागणारा गमत्या स्वभाव त्यांच्याकडे होता. गेल्या वर्षी त्यांचा ११० वा वाढदिवस झाला.  जीवनातील चांगल्या गोष्टींकडे पहा. तुम्ही तुमच्यासाठी जे करता येईल ते करा, हा मूलमंत्र आपल्यासाठी मागे ठेवून त्या गेल्या आहेत.