गॅरी पॉलसेन

अवघे पाच डॉलर खिशात ठेवून लहानग्या गॅरींना आईनं आगगाडीत बसवून दिलं, ‘मामाकडे जा’ म्हणाली.

ब्रायन रॉबेन्सन नावाचा अमेरिकन किशोरवयीन मुलगा छोटय़ा विमानातून आपल्या (घटस्फोटित) वडिलांकडे अलास्काला जात असताना हृदयविकाराच्या झटक्यानं वैमानिक मरतो. विमान कसंबसं एका तळ्यात उतरवतो एकटा ब्रायनच. पुढले ४५ दिवस त्याच्या मदतीला कोणीही नसतं. नाही म्हणायला, विमानात काही खाद्यपदार्थ असतात; पण तो तगून राहतो आईनं त्याला भेट म्हणून दिलेल्या कुऱ्हाडीमुळे आणि जंगलाकडून शिकत राहण्याची तयारी असल्यामुळे! ‘हॅचेट’ या बाल-कादंबरीत ही गोष्ट सांगणारे अमेरिकी लेखक गॅरी पॉलसेन हे किशोरवयातली मुलं कशी शहाणी होत असतात, हे नेमकं ओळखायचे. सुमारे १३० पुस्तकं लिहिलीत त्यांनी. बुधवारी, वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी लिहिलेल्या एकंदर सर्व पुस्तकांच्या साडेतीन कोटी जगभरात वाचल्या जात असतील, असा त्यांच्या प्रकाशकांचा अंदाज आहे आणि पॉलसेन यांनी लेखक म्हणून कमावलेली संपत्ती सुमारे ३० लाख डॉलर आहे. अवघे पाच डॉलर खिशात ठेवून लहानग्या गॅरींना आईनं आगगाडीत बसवून दिलं, ‘मामाकडे जा’ म्हणाली. मग सातव्या वर्षी आजीकडे धाडलं. मग घेऊन गेली बाबांकडे! तिथं हे आईबाप दारू पिऊन भांडायचे. चौदाव्या वर्षी गॅरींनी घरच सोडलं. आधी बीट-शेतीवर, मग असंच मिळेल तिथं काम करू लागले. कार्निव्हलमधल्या सोंग्याचं (कार्नी) काम फारच आवडलं. आजीकडे काढलेल्या पाचेक वर्षांत वाचनाची गोडी लागली होती, ती मात्र कायम राहिली. अभ्यासाला बेतासबात, अठराव्या वर्षी काठावर पास होत हायस्कुलाबाहेर पडले, सैन्यात गेले. तिथल्या अनुभवाच्या बळावर एका विमान कंपनीत लागले. पण २८ व्या वर्षी लेखकच व्हायचं ठरवून पुन्हा मूळ राज्यात, कॅनडालगतच्या मिनसोटामध्ये आले.  ‘सम बर्ड्स डोन्ट फ्लाय’, ‘द स्पेशल वॉर’ ही पुस्तकं मुलांसाठी लिहिलेली नव्हती, पण कुतूहल शमवणारी होती. १९६९ चं ‘मिस्टर टकेट’ हे पुस्तक किशोरवयीन मुलग्यांमध्ये प्रिय झालं, तेव्हापासून गॅरी स्वत:ची गोष्ट एखाद्या पोरसवदा नायकामार्फत सांगू लागले. ‘गॉन टु द वूड्स’ हे त्यांचं आत्मचरित्र २०२१ साली आलं, त्याचं उपशीर्षक बाल्य हरवल्याची कबुली देणारं ‘सव्‍‌र्हायव्हिंग अ लॉस्ट चाइल्डहूड’ असं आहे.  या पुस्तकामुळे त्यांच्या इतर अनेक पुस्तकांचा उलगडा होतो. गॅरी यांनाच छोटं विमान चालवताना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्या मुलानं विमान उतरवलं, हेही कळतं पण त्यापेक्षाही, लहानपणी शेकोटीवर मासा भाजताना धूर पसरवून किडय़ांना कसं पळवावं, कुऱ्हाडीचा वापर कसकसा करावा, हे त्यांना लहानपणीच शिकावं लागलं, याचं किस्सेदार वर्णन वाचताना ‘विदग्धता’ हा लेखकाचा गुण गॅरींकडे कसा आहे, हेही लक्षात येतं. लेखक म्हणून ते अजिबातच अभिजात वगैरे नव्हते. पण दररोज सहासहा तासाची लेखनबैठक ते मारत. ‘हाऊ टु ट्रेन युअर डॅड’ किंवा दीडशहाण्या पोराची ‘लायर लायर’ मालिका, हे किशोरांसाठीचं अचाट-अनवट साहित्य त्यातून (आणि स्वत:च्या तिघा पोरांमुळे) आलं. मोबाइलपूर्व जमान्यातला, तंत्रज्ञानाऐवजी जंगलावर प्रेम करणारा हा लेखक  ‘जुना’ होईल; पण ईशान्य अमेरिकेतल्या निसर्गवर्णनांसाठी पुन्हा ‘ब्रायन मालिका’ किंवा ‘ग्रिझली’ वाचा, असं पुढल्या पिढीलाही कदाचित सांगितलं जाईल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: American author gary paulsen profile zws

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या