संशोधक असूनही शैलीदार ललितेतर लिखाणाबद्दल दोन पुलित्झर पारितोषिके जिंकणे, निसर्ग अभ्यासक असूनही धर्माशी पूर्ण फारकत न घेणे, पृथ्वी वाचवण्यासाठी विज्ञानवादी आणि धर्मवादी मंडळींनी एकत्र येण्याचा आग्रह धरणे, मानवापेक्षा अधिक हुशार अशी एखादी शक्ती अस्तित्वात असू शकेल याची कबुली देणे अशा विरोधाभासी घटकांनी एडवर्ड ऑसबॉर्न तथा ई. ओ. विल्सन यांचे आयुष्य समृद्ध आणि रंजक बनवले. मुंग्यांविषयी प्राधान्याने संशोधन करताना, त्यांच्या स्वभावगुणांच्या आधारे मानवी परस्परसंबंधांचा आणि जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्यांनी मांडलेल्या संशोधनाबद्दल विल्सन यांना ‘आधुनिक जगतातील ‘डार्विन’’ असे संबोधले जाई. चार्ल्स डार्विन यांनी मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धान्तानंतर निसर्ग अभ्यासक ही जमात मानववंशशास्त्र आणि निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची ठरू लागली होती. परंतु आधुनिक जगतात जनप्रिय झालेले निसर्ग अभ्यासक दोनच- ई. ओ. विल्सन आणि डेव्हिड अ‍ॅटनबरा. यांतील विल्सन यांचा नुकताच वृद्धापकाळाने मृत्यू झाला. अमेरिकेत अलाबामा राज्यातील बर्मिगहॅममध्ये १९२९ साली विल्सन जन्मले. पण लहानपणीच त्यांचे आईवडील विभक्त झाले नि दारुडय़ा बापामुळे पितृप्रेमही फार लाभले नाही. अशा परिस्थितीत विल्सन यांनी निसर्गालाच सखासोयरा मानले. जंगलांत भटकणे, तलावांत डुंबणे, जंगली प्राणी पाहात राहाणे असे उद्योग केल्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती तीक्ष्ण बनली. एकदा मासेमारी करताना अपघातात त्यांचा एक डोळाच जवळपास निकामी बनला. त्यामुळे मोठे प्राणी लांबून पाहता येणे दुरापास्त झाले, तेव्हा विल्सन यांनी कीटकांकडे- त्यातही मुंग्यांकडे – मोर्चा वळवला. अमेरिकेतील पहिल्या ‘बाहेरून स्थलांतरित’ मुंग्यांचा शोध त्यांचाच. त्यांचे सर्वाधिक गाजलेले संशोधन म्हणजे मुंग्यांचे रासायनिक संज्ञापन! अलाबामा विद्यापीठातून पदवी आणि हार्वर्डमधून डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.  आयुष्याच्या उत्तरार्धात निसर्ग संवर्धनावर लक्ष केंद्रित केले. मुंग्यांचे वागणे जसे जनुकीय संरचनेनुसार असते, तसेच मनुष्यप्राण्याचेही असते. त्यामुळे  लाखो वर्षांत मनुष्य उत्क्रांत होत आला, याचे कारण त्याचा मेंदू नव्हे तर जनुकीय संरचना असा त्यांचा दावा. म्हणजे भूतकाळात/वर्तमानात एका मनुष्यगटाकडून दुसऱ्या मनुष्यगटावर अन्यायाच्या हजारो घटना घडल्या व घडताहेत, त्यांमध्ये सदसद्विवेकबुद्धीचा अभाव हा घटकच नाही? सारे काही ‘जनुकीय आदेशा’नुसार घडत आले वा घडत आहे? विल्सन यांची ही भूमिका  ‘गोऱ्यांचा वंशश्रेष्ठवाद’ म्हणून वादग्रस्त ठरवली गेली. कारण विल्सन यांच्या न्यायानुसार सारेच कुकर्माच्या उत्तरदायित्वातून मुक्त होतात! पण अशा वादांची भीड विल्सन यांनी कधीच बाळगली नाही. वैज्ञानिक सत्याचा शोध सुरूच ठेवला पाहिजे, हा आग्रह ते आचरणातही आणत असल्याने नवनवे आकलन ते जगापुढे ठेवत राहिले.