श्रीलंकेतील आता विरून गेलेली हिंसक तामिळ ईलम चळवळ आणि महात्मा गांधींच्या अहिंसक लढय़ाची तत्त्वे यांचा काहीही संबंध नाही, असेच इतिहास मानतो. परंतु या समजाला छेद देणारा एक दुवा म्हणजे ‘गांधियम’ या टोपणनावानेच अधिक ओळखले जाणारे सॉलोमन अरुलनंदन डेव्हिड.. तेही गेल्या रविवारी निवर्तले. डेव्हिड यांनी १९७७ पासून गांधीजींच्या ‘ग्रामस्वराज्य’, ‘नयी तालीम’ आदी कल्पनांचा आधार घेऊन श्रीलंकेच्या तमिळबहुल भागात कार्य उभारले होते.

डेव्हिड मूळचे वास्तुविशारद. शिष्यवृत्तीवर ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये जाऊन ते ‘बी. आर्क.’ झाले. श्रीलंका (तेव्हाचा सिलोन) सरकारने त्यांना ‘वरिष्ठ वास्तुविशारद’ या पदावर नेमले, परंतु दोन वर्षांनी ते परदेशी गेले. ब्रिटनमध्ये लिव्हरपूल शहर कात टाकत असताना- १९६०च्या दशकात- डेव्हिड हे तिथले सहायक नगररचनाकार होते. पुढे केनियाच्या मोम्बासा या शहराच्या आखणीची जबाबदारी ‘प्रमुख वास्तुविशारद आणि नगररचनाकार’ या पदासह त्यांच्याकडे आली. याच आफ्रिकी शहरातील एका वाचनालयाला कुणा भारतीयाने दिलेल्या नऊ हजार पुस्तकांच्या ठेव्यातील पुस्तके वाचण्यासाठी दर संध्याकाळी चार ते आठ या वेळेत डेव्हिड ठाण मांडत. यातूनच त्यांना गांधी-प्रेरणा मिळाली.

मग मात्र, आपण आपल्याच देशात काम केले पाहिजे, या ऊर्मीने ते इतके झपाटले की, दोन वर्षांत ते श्रीलंकेत परत आले आणि तेथे ‘गांधियम’ ही संस्था त्यांनी उभारली. १९७७ ते १९८३ या अवघ्या सात वर्षांच्या काळात या संस्थेने गांधीवादी कार्य पुढे नेले.. प्रत्येकी ३० विद्यार्थिसंख्येच्या ४५० बालवाडय़ा आणि प्राथमिक शाळा जाफना, बाटिकलोआ, वावुनिया अशा जिल्हय़ांत उभारल्या. याच जिल्हय़ांत १२ ठिकाणी ‘आदर्श सहकारी शेती प्रयोग’ राबवले. आरोग्यसेवेसाठी फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था केली आणि ग्रामसेविका म्हणून पाच हजार महिलांना प्रशिक्षण देणारे केंद्रदेखील उभारले. १९८० च्या दशकात वांशिक हिंसाचाराचा वणवा पेटलेला असताना मात्र, तमिळींच्याच बाजूने आपण उभे राहणार आहोत हे डेव्हिड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवून टाकले.

या वेडय़ा निष्ठेपायी त्यांना आरोपी ठरवून, तुरुंगातही ठेवण्यात आले होते. मात्र १९८३ साली तुरुंगातून पळून गेलेल्या २७ जणांत डेव्हिडही होते. सात दिवस वन्नीच्या जंगलात काढून, अखेर समुद्रमार्गे भारतात पोहोचून त्यांनी येथे आश्रय मिळवला. गेल्याच वर्षी ते मायदेशी, किलिनोच्ची शहरात राहू लागले. तेथेच ९१ व्या वर्षी त्यांच्या आयुष्याचे कोडे कायमचे मिटले.