‘लॉर्ड ऑफ दी रिंग्ज’ या महाकादंबरीचे लेखक जेआरआर टॉल्कीन यांचे पुत्र एवढीच ख्रिस्तोफर टॉल्कीन यांची ओळख नव्हती. थोरल्या टॉल्कीन यांच्या साहित्यनिर्मितीत त्यांनी रेखाचित्रांसह अनेक माध्यमांतून मोठा सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, वडिलांचा साहित्यिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी ‘टॉल्कीन सोसायटी’ नावाची संस्थाही स्थापन केली होती. या ख्रिस्तोफर टॉल्कीन यांची निधनवार्ता बुधवारी आली, तेव्हा जगभरातील टॉल्कीनपंथीय वाचकांनी हळहळ व्यक्त केली.

ख्रिस्तोफर यांचा जन्म इंग्लंडमधील लीड्सचा. वडील मोठे लेखक असल्याने त्यांनी सांगितलेल्या ‘बिल्बो बॅगिन्स’ व पुराणातील तत्सम गोष्टी ऐकतच त्यांचे बालपण सरले; नंतर यातूनच जेआरआर यांच्या ‘दी हॉबिट’ या कादंबरीने जन्म घेतला. ऑक्सफर्डमधील शिक्षणानंतर ख्रिस्तोफर हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण आफ्रिकेत गेले. युद्ध संपेपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तिथून परतले, ते थेट ऑक्सफर्डमध्येच इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. जेआरआर यांचे निधन १९७३ मध्ये झाल्यानंतर ख्रिस्तोफर हे ‘टॉल्कीन इस्टेट’चे कार्यकारी संचालक बनले. जेआरआर यांच्या अप्रकाशित साहित्याचा, हस्तलिखितांचा ठेवा पुत्र म्हणून ख्रिस्तोफर यांच्याकडे आपसूकच आला होता. मात्र, त्याचे महत्त्व जाणून ख्रिस्तोफर यांनी त्या लिखाणाचे संपादन करण्यास जाणीवपूर्वक सुरुवात केली. यातूनच जेआरआर यांच्या मृत्युपश्चात, ‘दी सिल्मॅरिलियन’ व ‘दी फॉल ऑफ गोंडोलिन’ ही त्यांची दोन पुस्तके वाचकांसमोर आली. मात्र, यातील ‘दी सिल्मॅरिलियन’चे कर्ते खुद्द ख्रिस्तोफर तर नाहीत ना, अशी शंका काहींनी तेव्हा व्यक्त केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून, ख्रिस्तोफर यांनी जेआरआर यांच्या तब्बल ७० खोकी भरून असलेल्या हस्तलिखितांचे संपादन करून १२ खंडांत ‘हिस्टरी ऑफ मिडल-अर्थ’ ही ग्रंथमालिका सिद्ध केली. त्यात जेआरआर यांचे स्फुट लेखन, टिपणे, पुनर्लेखनाचे खर्डे व इतर अप्रकाशित अशा बऱ्याच लेखनाचा समावेश आहे. या ग्रंथांत ख्रिस्तोफर यांनी रेखाचित्रेही काढली आहेत.

लयाला गेलेल्या एका आदर्श जगाची कहाणी सांगणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ दी रिंग्ज’ या कादंबरीत्रयीच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. त्यातील अनेक चुका दुरुस्त करून त्यांनी १९७० मध्ये संपादित आवृत्ती प्रकाशित केली होती. त्यामुळेच पुढे या कादंबरीचे माध्यमांतरातून व्यावसायिकीकरण करण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यास कडाडून विरोध केला होता.

काही काळ ख्रिस्तोफर टॉल्कीन फ्रान्समध्ये वास्तव्याला होते. त्यामुळे तेथील साहित्य-संस्कृतीचाही प्रभाव त्यांच्यावर होता. जेआरआर यांच्या अनेक पुस्तकांतील काही कल्पनारम्य प्रसंग हे ख्रिस्तोफर यांच्या सर्जनशीलतेतून उतरलेले आहेत, हेही नंतर स्पष्ट झाले. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच जेआरआर यांच्या साहित्याचे पहिले वाचक आणि पुढे सर्जक सहकारी राहिलेले ख्रिस्तोफर यांनी जेआरआर यांच्या साहित्यकृतींमागची सर्जनशील प्रक्रिया उलगडून दाखवली. जेआरआर यांच्या साहित्यकृती लोकप्रिय करण्यात ख्रिस्तोफर टॉल्कीन यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने जेआरआर टॉल्कीन यांच्या साहित्याचा साक्षेपी अभिरक्षक काळाआड गेला आहे.