मानाचे पद जोखमीचेही असेल, तर त्या पदाची उंची अधिकच वाढते. असे मान, जोखीम व उंची देणारे पद भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे शुक्रवारपासून स्वीकारणार आहेत, ही विशेष अभिनंदनीय बाब. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)चे महासंचालक हे या संस्थेचे प्रमुख असले, तरी त्याखालोखाल मानाचे व महत्त्वाचे पद हे डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळ अध्यक्षांचे. कार्यकारी मंडळात ३४ देशांचा समावेश असतो आणि धोरणांचे सुकाणू हे मंडळ सांभाळते. ‘कोविड-१९’मुळे या संघटनेत जणू बेदिली माजली असताना हे पद डॉ. हर्षवर्धन यांना मिळावे हे उत्तमच, कारण सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याचा त्यांचा अनुभव १९८४ पासूनचा आहे. त्या वर्षी, दिल्लीत कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून बस्तान बसवू पाहणारे हर्षवर्धन ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या कार्यात उतरले. मूळचे दिल्लीचे आणि रा. स्व. संघाच्या मुशीतील ओमप्रकाश गोयल यांचे पुत्र असलेले हर्षवर्धन पुढे भाजपमध्येही कार्यरत झाले. भाजपची ‘डॉक्टर विंग’ स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. दिल्लीत मदनलाल खुराणा, सुषमा स्वराज यांची सरकारे होती तेव्हा हर्षवर्धन यांनी या शहरराज्याचे आरोग्य मंत्रिपद सांभाळले.. पण विचार देशाचा केला! १९९४ पासून त्यांनी पोलिओमुक्त भारत मोहिमेला संघटित प्रयत्नांची दिशा दिली. याची दखल घेऊन त्यांना १९९८ मध्ये डब्ल्यूएचओतर्फे प्रतिष्ठेचे ‘महासंचालक पदक’देखील मिळाले होते. आता याच संस्थेत, ३४ कार्यकारी सदस्य-देशांच्या प्रतिनिधींचे नेतृत्व डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे असेल.

हे पद भारतास मिळावे, यावर गेल्या वर्षीच सहमती झाली होती. डब्ल्यूएचओ कार्यकारी मंडळाच्या १४७ व्या बैठकीत शुक्रवारी त्यांची औपचारिक निवड जाहीर होईल. हे पद वर्षभरासाठी असते. हे वर्ष ‘कोविड-१९’चे असल्याने संभाव्य लसींचा समन्यायी वापर, देशांना साह्य़ वा दंड करण्याच्या शिफारशी, असे कठीण विषय त्यांना हाताळावे लागतील.  पक्षभेद आणि त्यातून येणारी संकुचितता बाजूला ठेवण्याची तयारी, हा डॉ. हर्षवर्धन यांचा गुण आजवर सातत्याने दिसलेला आहे. मग, तंबाखूमुक्तीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत की प्लास्टिकबंदीसाठी दिल्लीतील चर्चच्या संघटनांमार्फत पर्यावरणनिष्ठ पिशव्यांचा पर्याय शोधणे असो की राज्यांना पोलिओमुक्तीचे महत्त्व (१९९० च्या दशकात) पटवून सांगणे. हर्षवर्धन यांची सर्वकल्याणक मनोभूमिका त्यांना यश देणारी ठरली, याचे श्रेय ते विवेकानंद-विचारांच्या संस्कारांस देतात. पोलिओ निर्मूलनासाठी ‘रोटरी’चा पुरस्कार त्यांना देताना अटलबिहारी वाजपेयींनी त्यांचा उल्लेख ‘स्वास्थ्यवर्धन’ असा केला होता; तो आता जगालाही पटावा, अशी संधी त्यांच्यापुढे आहे.