माधवराव भिडे

रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

माधवराव भिडे

मराठी उद्योजकांमध्ये सहकाराची रुजवणूक करण्याचे आव्हान एका व्यक्तीने लीलया पेलले आणि तेही ‘अवघे होऊ  श्रीमंत’ अशा सनातन मराठी मानसिकतेला आव्हान देणारे ब्रीद घेऊन! माधवराव भिडे हे एक व्यक्ती नव्हे तर संस्थाच होते, हे त्यांचा कार्यपट पाहता निश्चितच म्हणता येईल. संघटनकौशल्य, माणसे जोडणारा जिव्हाळा, लोकसंपर्काची आस, एकदा ठरविलेला संकल्प तडीस नेणारा कामाचा उत्साह आणि ऊर्जा, पटकन कोणालाही मदतीसाठी तत्परता अशा साऱ्या गुणांचा समुच्चय म्हणजे माधवराव. ब्रिज इंजिनीअर असलेल्या माधवरावांनी मराठी उद्योजकतेत मैत्रीचा मजबूत पूल बांधला! ‘मी व्यावसायिक होईनच’ असे स्वप्न मराठी तरुणांनी पाहावे, उद्योग वाढवावा, संपत्ती निर्माण करावी आणि स्वत:बरोबरीने इतरांनाही मदतीचा हात देत मोठे करावे, अशा भूमिकेतून त्यांनी २००० सालात सॅटर्डे क्लबची स्थापना केली. या संस्थेच्या आज ४५हून अधिक शाखा आणि १,७०० उद्योजक सदस्यांनी त्याला मूर्तरूप देत खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकतेचा स्वयंसाहाय्य गट कार्यान्वित केल्याचे दिसून येते.

खरे तर माधवरावांचा उद्योजकीय प्रवास हा सेवानिवृत्तीनंतरच सुरू झाला. रेल्वेतील मुख्य अभियंता पदावरून ५६व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. तथापि पेन्शनवर गुजराण करीत स्वान्तसुखाय जगणे शक्य असताना, त्यांनी आंतरिक ऊर्मीला अनुसरून उद्योजकतेचा मार्ग चोखाळला. रेल्वेतील मुख्य अभियंता म्हणून कारकीर्दीत त्यांनी कमी खर्चात, सुदृढ, सुबक आणि टिकाऊ  बांधकामाचे अनेक प्रयोग यशस्वीरीत्या राबविले. दिवा- डोंबिवली- वसई रेल्वे मार्गाचा प्रकल्प तसेच वांद्रे-खार हार्बर मार्गाचा अंधेरीपर्यंत विस्तार आणि त्यासाठी ‘प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वेच्या इतिहासात प्रथमच बांधण्यात आला. निवृत्तिपश्चात अभियांत्रिकी आणि सनदी कामाच्या प्रदीर्घ ज्ञान-अनुभवाच्या भांडवलावर ‘भिडे असोसिएट्स’ या सल्लागार संस्थेचा डोलारा त्यांनी उभा केला. कामे इतकी वाढत गेली की अल्पावधीतच देशभरात त्याच्या १५ शाखा उभ्या राहिल्या. ध्येयकेंद्रित सामाजिकता अंगी असल्याने पुलांची उभारणी, त्यामागील अभियांत्रिकी आणि त्यांच्या सांस्कृतिक-आर्थिक महत्त्वाला अधोरेखित करणारी ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स (आयबीबीई)’ची स्थापना त्यांनी १९८९ साली केली. म्हणजे वयाच्या सत्तरीत, ज्या वयात अनेकांना जीवनाबद्दलचा ध्यास संपलेला असतो, त्या वयात माधवरावांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्थांची पायभरणी केली. नेतृत्वाची दुसरी तरुण फळी हेतुपुरस्सर निर्माण करीत या संस्थांची पाळेमुळे मजबूत पायावर रुजतील याचीही काळजी घेतली.

‘आयआयबीई’द्वारे पूलबांधणीचे अनुभव देश-विदेशांतून भारतीय अभियंत्यांना देणारे, ज्ञान-तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ त्यांनी उभे केले. पूल हा केवळ दोन भूभागांना वाहतूकदृष्टय़ा जोडत नसतो, तर ज्ञान, संस्कृती, व्यापार-उदीम, अर्थकारणाला जोडणारा पैलूही त्याला असतो. सॅटर्डे क्लबच्या मार्फत भिडे यांनी, मराठी उद्योजकांना असाच समग्रतेने जोडणारा सेतू सांधू पाहिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr madhavrao bhide profile