डॉ. पराग वैशंपायन

डॉ. पराग हे जन्माने मुंबईकर. त्यांनी हाफकिन संस्थेतून सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली.

डॉ. पराग वैशंपायन

‘नासा’तील भारतीय वंशाचे खगोलजीवशास्त्रज्ञ अशी डॉ. पराग वैशंपायन यांची ओळख असली तरी भारतातील संशोधनाशीही अजून ते बऱ्याच प्रमाणात संबंधित आहेत. अलीकडेच ‘नासा’च्या प्रयोगशाळेने स्तनाच्या कर्करोगाचा जिवाणूंशी संबंध असतो असा जो निष्कर्ष संशोधनाअंती मांडला आहे; त्या संशोधक चमूत ते प्रमुख आहेत. स्तनाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो हे अद्याप नेमके कुणी सांगू शकत नाही. स्तनांमध्ये ज्या दुग्धवाहिन्या असतात त्यातील द्रवात काही उपकारक व काही अपायकारक जिवाणू असतात, त्यापैकी ज्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो त्यांच्यात अपायकारक जिवाणू असतात असा या संशोधनाचा मथितार्थ. वैशंपायन हे सूक्ष्मजीवशास्त्रातले तज्ज्ञ आहेतच. एकूण ३५ शोधनिबंध त्यांनी लिहिलेले आहेत.

डॉ. पराग हे जन्माने मुंबईकर. त्यांनी हाफकिन संस्थेतून सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. एमएससीला असताना त्यांनी एलिसा या एड्सशोधक संचाच्या निर्मितीत मोठे काम केले होते. नंतर महासागरविज्ञान संस्थेत सूक्ष्मजीव संशोधन केले. विषाणुतज्ज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, पण ती पुढे व्यापक बनली. पुण्याच्या आघारकर संस्थेतून ते पीएच.डी. झाले. एनसीसीएस या पुण्याच्या संस्थेत डॉ. योगेश शौचे यांच्या प्रयोगशाळेत पश्चिम घाटातील कीटक व प्राण्यातील जिवाणूंचे संशोधन केले. इस्रोने स्ट्रॅटोस्फिअरमधील सूक्ष्मजीव शोधण्यासाठी बलूनचा प्रयोग केला होता त्याचे नेतृत्व डॉ. जयंत नारळीकर, सीसीएमबीचे डॉ. एस. शिवाजी व डॉ. शौचे यांनी केले होते, त्यातही काम करण्याची संधी वैशंपायन यांना मिळाली. त्या वेळी जॅनिटोबॅक्टर हॉइल व बॅसिलिस इस्रोनेसिस व बॅसिलिस आर्यभट्ट या सूक्ष्मजीवांच्या प्रजाती सापडल्या होत्या.

‘एक होता काव्‍‌र्हर’ हे वीणा गवाणकर यांचे पुस्तक वाचून डॉ. पराग यांना वैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळाली. ‘इस्रो’च्या पुढच्या मंगळ मोहिमेसाठी सूक्ष्मजीव संशोधनाबाबत मदत करण्याची त्यांची तयारी आहे. लडाखमधील संशोधन मोहिमेसाठी ते लवकरच भारतात येणार आहेत. प्रत्येक मुलाला ‘नासा’त अंतराळवीर व्हावेसे वाटते, पण वैशंपायन यांना जैववैज्ञानिकच व्हायचे होते. त्यांनी अमेरिकेत गेल्यानंतर लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत मानवी आतडय़ातील जिवाणूंवर संशोधन केले. २०११ मध्ये ते ‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. अवकाशातही सूक्ष्मजीव असू शकतात, त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेणारे शास्त्र म्हणजे खगोलजीवशास्त्र. त्यातही त्यांनी मोठे काम केले आहे. कुठलेही यान अवकाशात पाठवताना ते सूक्ष्मजीवमुक्त आहे यासाठी जी जबाबदार व्यक्ती सही करते, त्यापैकी वैशंपायन एक आहेत. लडाख येथील स्पेसवर्ड बाउंड इंडिया प्रकल्पात त्यांचा सहभाग आहे. रॉक क्लाइम्बिंग, बॅक पॅकिंग, हायकिंग हे सह्याद्रीने लावलेले छंद ते आता कॅलिफोर्नियात जपतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr parag vaishampayan

ताज्या बातम्या