१ ऑक्टोबर २०१२ पासून मर्सडिीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून एबरहर्ड केर्न युरोपात मर्सडिीज बेंझमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी पायउतार झाले. एबरहर्ड केर्न यांच्या बदलीची दखल घेण्याचे कारण केर्न यांच्या कार्यकाळात पुणे जिल्ह्य़ातील चाकण औद्योगिक क्षेत्रात १०० एकर परिसरात उभ्या असलेल्या कारखान्याने एका वर्षांत ३० हजार वाहनांची जुळणी करण्याचा व देशांतर्गत दहा हजार वाहन विक्रीचा टप्पा प्रथमच गाठला.
जगभरात मर्सडिीज या नाममुद्रेची वाहने वापरणे हे त्या वाहनात मिळणाऱ्या सुविधांपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेशी निगडित आहे. तशी ती भारतातील नवश्रीमंत वर्गातदेखील आहे. ही लक्ष्मीपुत्रांच्या मनातील भावना ओळखून त्याचे रूपांतर आपल्या व्यवसायवृद्धीसाठी करणारे एबरहर्ड केर्न हे अव्वल विपणनतज्ज्ञ आहेत. मर्सडिीज बेंझची वाहने खरेदी करण्यासाठी त्यांनी भारतातील बाजारपेठेसाठी ध्येये निश्चित केली व ती ध्येये गाठण्यासाठी धोरणे राबविली. उत्पादन वाढवून विक्रेत्यांचे व सेवा केंद्रांचे देशभर जाळे विणण्यासोबत ‘मर्सडिीज’ ही नाममुद्रा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी एबरहर्ड केर्न यांनी विशेष योजना राबविल्या.
या धोरणाचा एक भाग म्हणून एबरहर्ड केर्न यांनी खऱ्या अर्थाने भारत देश काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पालथा घालत ४२ शहरांतून आपले विक्रेते नेमले. या प्रत्येक विक्रीदालनाला एबरहर्ड केर्न यांनी भेट दिली आहे. प्रत्येक विक्रीदालनाला भेट देणारा हा पहिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी असावा. यामुळे भारतात आलिशान वाहन गटात ऑडी व बीएमडब्लू यांना मागे सारून मर्सडिीज बेंझ ही नाममुद्रा मागील चार वष्रे सतत प्रथम क्रमांकावर आहे. १९६३ साली जन्मलेल्या एबरहर्ड केर्न यांनी १९८५ मध्ये स्टुटघर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी मिळविली. १९९२ मध्ये मर्सडिीजमध्ये दाखल झालेले केर्न भारतात येण्यापूर्वी मर्सडिीज बेंझ तवानचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष होते.
महाराष्ट्रातील औरंगाबादसारख्या शहरातील लक्ष्मीपुत्रांनी एकाच वेळी १०० मर्सडिीजची वाहने खरेदी केल्याची बातमी माध्यमातून चवीने चíचली गेली हा केर्न यांच्या विपणन धोरणाचा एक भाग होता. प्रवासी वाहन उद्योगात प्रत्येक विकलेल्या वाहनामागे नफ्याचे प्रमाण कमी असल्याने नेहमीच जितक्या जास्त संख्येने वाहन विक्री तितके नफ्याचे प्रमाण अधिक. या निकषावर केर्न हे वाहन उद्योगातील यशस्वी सीईओ समजले जातील. एबरहर्ड केर्न हे नाव भारतापासून दूर गेले तरी भारतीय वाहन उद्योगात नेहमीच त्यांच्या नावाची दखल घेतली जाईल.