एली वीझेल

छळछावणीत तेव्हा १५ वर्षांचे असलेले एली आणि त्यांचे वडील शलोमो हे दोघेही गुलामासारखी कामे करण्यास योग्य वयाचे होते

ऑश्विट्र्झच्या हिटलरी छळछावणीतून एली वीझेल बचावले हे त्यांचे कर्तृत्व नव्हे. पण या वाचलेल्या जिवाने अन्य जिवांची होरपळ ‘नाइट’ या पुस्तकात आणली. यावर न थांबता ते पुढे लिहीतच राहिले आणि त्यांच्या सुमारे ५० पुस्तकांतून शोषितांच्या दुखाला वाचा फुटत राहिली. यापैकी अनेक पुस्तके त्यांनी कंबोडिया किंवा दक्षिण आफ्रिका आदी ठिकाणी जाऊन लिहिली होती. मानवी हक्क कार्यकर्ता म्हणून प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासही ते पुढे असत. या साऱ्याची दखल घेऊन त्यांना १९८६ सालचे नोबेल शांतता पारितोषिक मिळाले, त्याआधी आणि नंतरही अगदी इस्रायलच्या विरुद्ध लिखाण त्यांनी केले आहे. वीझेल यांची प्राणज्योत २ जुलै रोजी वृद्धापकाळाने, अमेरिकेतील राहत्या घरी मालवली.

छळछावणीत तेव्हा १५ वर्षांचे असलेले एली आणि त्यांचे वडील शलोमो हे दोघेही गुलामासारखी कामे करण्यास योग्य वयाचे होते, म्हणून जिवंत राहिले. मारलेल्या ज्यूंची प्रेते जाळण्याचे काम या बापलेकांना देण्यात आले. ‘कसे गेले, कोण होते, कोणीच सांगत नाही; असे लोक रोज जळत.. त्या ज्वाळांत माझा देव आणि माझा आत्माही जळून गेला. मानवतेचा धूर झाला’ असे वर्णन एली यांनी ‘नाइट’मध्ये केले आहे. एली यांना ऑश्विट्र्झहून बुचेनवाल्डच्या छावणीत नेले गेले आणि ही छावणी एप्रिल १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी मुक्त केल्यामुळे त्यांची रवानगी फ्रान्सला झाली. पॅरिसमध्येच त्यांचे उच्चशिक्षण झाले. ‘नाइट’ हे आधी फ्रेंचमध्ये (ल नुइ – १९५८) आले होते आणि १९६० मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला; पण पुस्तकातील भाषेचे कवितेइतके हृदयस्पर्शी सत्त्व कायम राहिले. त्याच वर्षी (१९६०) एली प्रथम अमेरिकेत आले. मग १९६४ पासून अमेरिकी नागरिक म्हणून त्याच देशात राहू लागले. कवीप्रमाणे काळजाला हात घालू शकणारे लिखाण पुढेही एली यांनी अनेकदा केले, तसेच गंभीर चर्चा करणारे, मुद्दे मांडणारे निबंधही लिहिले. नोबेल पारितोषिक स्वीकारतानाच्या भाषणात एलींनी तेव्हा तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांचा आणि पॅलेस्टिनी बेघरांचा उल्लेखही केला होता. ‘समतोल असून चालणार नाही. गप्प बसून तर नाहीच नाही. तुमचा समतोल नेहमी दमनशाहीच्याच पथ्यावर पडेल आणि तुमच्या मौनाने शोषकांचे फावेल. बाजू घेतलीच पाहिजे. दमनकारी तंत्रे आणि शोषणाच्या मार्गाविरुद्ध बोललेच पाहिजे’ असे एली सांगत.

‘कोणताही ज्यू जेरुसलेमला ‘पहिल्यांदाच’ कधी येत नाही. तो जेव्हा जेरुसलेमास येतो, तेव्हा मायभूमीतच आलेला असतो’ असे एका मुलाखतीत सांगणाऱ्या एलींना धर्माबद्दल ममत्व होते. पण इस्रायली राज्यकर्त्यांनी रेटून पॅलेस्टिनींना देशोधडीस लावण्यास त्यांचा विरोध होता. धार्मिक असणे आणि कट्टर असणे या दोन निरनिराळय़ा बाबी आहेत आणि कोणत्याही धर्माचा अतिअभिमान इतर धर्मीयांच्या दमनाकडेच नेतो, हे सूत्र त्यांच्या निबंधांतूनही सापडे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Elie wiesel

ताज्या बातम्या