विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडचे तारू शेवटपर्यंत ताब्यात ठेवण्याचे श्रेय नि:संशय त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचे. तो खरे तर आक्रमक फलंदाज. त्यामुळे अंतिम चेंडूवर दोन धावा हव्या असताना, षटकार वा चौकाराचा मार्ग त्याला स्वीकारता आला असता. पण बेनने भान ठेवून व्यावहारिक मार्ग पत्करला आणि सामना सुपर-ओव्हरमध्ये नेला. ‘भारत वि. बांगलादेश यांच्यातील टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशी फलंदाजांनी षटकार लगावण्याच्या नादात सीमारेषेवर झेल दिले होते. ती चूक मला करायची नव्हती,’ असे त्याने सामन्यानंतर सांगितले.  मुख्य सामन्यातील ८४ धावा आणि सुपर-ओव्हरमध्ये ८ धावा इंग्लंडसाठी निर्णायक ठरल्या. तितकेच निर्णायक ठरले, त्याने लगावलेले चौकार. केवळ चौकारांच्या संख्येवर विश्वविजेता ठरवल्या गेलेल्या या सामन्यात बेन स्टोक्सने मुख्य सामन्यात आठ (इंग्लंडचे एकूण चौकार २६) आणि सुपर-ओव्हरमध्ये एक चौकार मारला. न्यूझीलंड संघाने मुख्य सामन्यात १७ चौकार लगावले. हे शहाणपण बेनच्या ठायी आहे, याबाबत शंका वाटण्यासारखी परिस्थिती दोन वर्षांपूर्वी ओढवली होती. ब्रिस्टॉलमध्ये एका नाइट क्लबात हाणामारी केल्याबद्दल बेनला अटक झाली होती. या प्रकरणात त्याची गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झाली खरी, पण यामुळे त्याला इंग्लंडचे उपकर्णधारपद गमवावे लागले आणि अ‍ॅशेस मालिकेलाही तो मुकला. तीन वर्षांपूर्वी टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजच्या कालरेस ब्रेथवेटने चार षटकार मारून वेस्ट इंडिजला विजयी केले. त्या नैराश्यातून एखादाच क्रिकेटपटू तावून-सुलाखून निघू शकला असता. तो सामना आणि ब्रिस्टॉलमधील प्रकार या दोन्ही आव्हानात्मक प्रसंगांतून सावरून बेन स्टोक्स पुन्हा जिद्दीने खेळू लागला. विश्वचषक स्पर्धेत त्याने पाचव्या क्रमांकावर येऊन पाच अर्धशतकांसह केलेल्या ४६५ धावा इंग्लंडसाठी बहुमोलाच्या ठरल्या. द. आफ्रिकेविरुद्ध सीमारेषेवर त्याने घेतलेला अफलातून झेल ‘शतकातील सर्वोत्तम’ या बिरुदाने आजही गाजत आहे. भारताविरुद्ध अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात बेनने ५४ चेंडूंमध्ये ७९ धावा तडकावून इंग्लंडला सुस्थितीत नेले होते. परवा अंतिम सामन्यात धाव पूर्ण करताना त्याच्या बॅटला लागून चेंडू सीमापार गेला आणि इंग्लंडला सहा धावा बहाल झाल्या. त्या वेळी चार धावा आम्हाला नकोत, असे पंचांना सांगण्याचे विशालहृदयी धाडसही बेनने दाखवले. मूळ न्यूझीलंडचा असलेल्या बेनने इंग्लंड हे  विजेते म्हणून घोषित झाल्यानंतरही प्रथम न्यूझीलंडवासीयांची माफी मागितली! हा विवेक, ही खिलाडूवृत्ती बेनला निव्वळ कौशल्यापलीकडे महान बनवून जाते.