जागतिक सिनेमा समृद्ध बनवण्यात फ्रेंच नवप्रवाही चित्रपटांचा (फ्रेंच न्यू वेव्ह) वाटा अनन्यासाधारण आहे. या नवप्रवाही चित्रपटांची समीक्षा ज्याँ लुक गोदार या दिग्दर्शकाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि या गोदार यांचे आयुष्य आणि चित्रपट अ‍ॅना करिना यांच्याशिवाय अपूर्ण आहे. १७व्या वर्षी डेन्मार्कमधील कष्टप्रद आयुष्य विसरण्यासाठी अ‍ॅना करिना फ्रान्समध्ये- पॅरिसमध्ये आल्या. सुरुवातीला फुटकळ स्वरूपाचे मॉडेलिंग आणि इतर कामे करत असताना गोदार यांच्या नजरेस पडल्या. त्यावेळी अत्यंत गाजलेल्या ‘ब्रेथलेस’ चित्रपटातील भूमिकेसाठी गोदार यांनी अ‍ॅनाकडे विचारणा केली. पण अंगप्रदर्शन करावे लागणार असल्यामुळे अ‍ॅना यांनी नकार दिला. तोपर्यंत खरे म्हणजे दोघांना परस्परांविषयी आकर्षण वाटू लागले होते. एका अविस्मरणीय सिने-भागीदारीची सुरुवात तेथेच झाली. जागतिक सिनेमामध्ये दिग्दर्शक-नायिका पती-पत्नीच्या काही प्रथितयश जोडय़ा आहेत. जोसेफ फॉन स्टनबर्ग आणि मार्लिन डिट्रिच, रॉबेर्तो रोसेलिनी आणि इनग्रीड बर्गमन ही काही उदाहरणे. फ्रेंच नवप्रवाही चळवळीत तर अशा जोडय़ा अधिक संख्येने आढळतात. लुइ माले आणि जीन मोरो, क्लाउड शाबरोल आणि स्टेफानी ऑद्रां, ज्याँ लुक गोदार आणि अ‍ॅना करिना. अ‍ॅना करिना यांचा पहिला चित्रपट ‘द लिटल सोल्जर’ हा गोदार यांनीच दिग्दर्शित केला होता. गोदार यांचा तो दुसरा चित्रपट. पण त्यातील अल्जीरियाविषयक राजकीय भाष्यामुळे त्याचे प्रदर्शन रखडले. त्याआधी गोदार-अ‍ॅना यांचा ‘अ वुमन इज अ वुमन’ प्रदर्शित झाला. निरागस चेहरा, अल्लड प्रामाणिकपणा आणि अत्यंत सहज वावर या गुणांमुळे अ‍ॅना करिना यांनी सुरुवातीला अडखळते फ्रेंच बोलत असूनही छाप पाडली. अर्थात त्यांना मोकळे अवकाश बहाल करणारा दिग्दर्शक हा पतीच असल्याचा फायदाही झाला. गोदार यांनी एक जाहिरात करून ‘द लिटल सोल्जर’साठी नायिकेसाठी अर्ज मागवले होते. त्या जाहिरातीत आणखी एक उल्लेख ‘जीवनसाथी’ असा होता. गोदार यांच्या मिश्किल तऱ्हेवाईकपणाचा तो आविष्कार होता. अ‍ॅना करिना यांना या उल्लेखाची कल्पना नव्हती. त्यामुळे जाहिरातीला प्रतिसाद देऊन निवड झाल्यानंतरच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्याबद्दल अनेक वर्तुळांतून त्यांची थट्टा केली जायची. मात्र अ‍ॅना यांनी याची कधी पर्वा केली नाही. १९६१ ते १९६५ या काळात गोदार-अ‍ॅना यांनी आठ चित्रपट केले. नंतर ते विभक्त झाले. अ‍ॅना यांनी त्यानंतरही काही चांगले चित्रपट केले. पण गोदारच्या चित्रपटांची नायिका ही छाप त्यांना पुसता आली नाही.

अर्थात परवा ७४व्या वर्षी अंतिम श्वास घेईपर्यंत या गोष्टीची खंत त्यांना कधीही वाटली नाही.