‘महात्मा गांधी हे आजघडीला सर्वात महान मार्क्‍सवादी नेते आहेत’ असे १९४८ साली म्हणणारा २२ वर्षांचा तरुण मूर्ख नव्हता, त्याचे सामान्यज्ञान कमी नव्हते.. तो कवी होता! ‘जे न देखे रवि’ ते पाहात होता!  साहजिकच ईएमएस नंबुद्रिपाद व अन्य मार्क्‍सवादी नेत्यांशी त्याचे पटले नाही आणि पुढले आयुष्य त्याने लिखाणातच जीव रमवला.. त्या वेळचा हा तरुण म्हणजे, नुकतीच ज्ञानपीठ पुरस्कारासाठी ज्यांची निवड जाहीर झाली ते मल्याळम् कवी अक्कितम अच्युतन नंबुद्री.

कम्युनिस्टांशी अक्कितम यांचा खरा वाद झाला तो हिंसेच्या वापराबाबत. रक्तरंजित क्रांतीचा ठराव कम्युनिस्टांनी १९४८ साली कोलकात्यात केला, तेव्हा. त्याआधी ईएमएस नंबुद्रिपाद यांच्याशी अक्कितम नंबुद्री यांची मैत्री होती. मार्ग वेगळे झाल्यावरही अक्कितम यांनी समाजाकडे लक्ष कायम ठेवले. नंबुद्री ब्राह्मण कुटुंबांतील अशिक्षित स्त्रियांची स्थिती त्यांना दिसू लागली, अन्य अनेक सामाजिक व्यंगांवर त्यांनी बोट ठेवले. गेल्या सुमारे ७० वर्षांत त्यांची ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि त्यापैकी ४५ काव्यसंग्रह आहेत. मल्याळममध्ये लिहिताना सारेच काव्यप्रकार त्यांनी हाताळले आणि खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य असे मोठे काम करतानाच गाणीसुद्धा लिहिली. कामगारवर्गाच्या जिण्याचा संदर्भ त्यांच्या ‘इरुपथम नूतनदिनते इतिहासम’ या आधुनिक काळावरील महाकाव्याला आहे. या काव्याच्या पहिल्याच ओळीत, ‘मी ढाळतो एक अश्रू माणसांसाठी माझ्या। सूर्याची असंख्य किरणे प्रकाशतात मनात माझ्या। त्यांच्यासाठी करतो मी स्मितहास्य जेव्हा। पवित्र पौर्णिमांचा पूर दाटतो हृदयात तेव्हा। हे नव्हते मला माहीत.. मी बसलो माझ्यासाठीच, माझी टिपे गाळीत।’ अशा शब्दांतून त्यांची आत्मजाणीव, समाजजाणीव आणि शब्दलालित्य एकाच वेळी प्रकटते.

अक्कितम यांची कविता आत्ममग्न आहे, संकेतबद्ध आहे, तिच्यात आजचा सामाजिक आशय कमीच आहे, अशी टीका अनेकदा झाली. तिची पर्वा न करता, भोवतालाशी इमान राखूनच ते लिहीत राहिले. टीकाकारांना नंतर समजले की, अक्कितम यांची कविता तत्त्वभान असलेली आहे, तिच्याकडून सामाजिक आशयाची थेट मागणी करणेच चुकीचे आहे. केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७२ आणि १९८८), केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३) आणि ‘पद्मश्री’ (२०१७) यांसारखे पुरस्कार मिळाल्यानंतर, वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांना ‘ज्ञानपीठ’ मिळते आहे.

ज्ञानपीठ पुरस्काराचे यंदा ५५ वे वर्ष, त्यापैकी अक्कितम हे मल्याळम भाषेत लिहिणारे पाचवे ज्ञानपीठ-मानकरी आहेत.