जय भीम, काला, असुरन यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा आज होते पण त्या चित्रपटांच्या आधी, वरकरणी तद्दन गल्लाभरूच वाटणारे जे चित्रपट तमिळ आणि मल्याळम् भाषांत निघाले, त्यांपैकी अनेक चित्रपटांनी सामाजिक वास्तवावर भाष्य करण्याची भूमी तयार केली होती. नुकतेच दिवंगत झालेले के. सेतुमाधवन् हे त्या आदल्या पिढीतले, अशा समाजदर्शी/ पण जनप्रियतावादी चित्रपटांचे दिग्दर्शक. धार्मिक दुहीमुळे प्रेमी जिवांची कशी तगमग होते, याचे दर्शन घडवणारा त्यांचा एक चित्रपट तर आज पन्नाशीत असलेल्या मराठीभाषक सिनेरसिकांनाही आठवत असेल – ‘ज्यूली’! १९७५ सालचा तो चित्रपट, १९७४ च्या ‘चट्टकारी’ या स्वत:च दिग्दर्शित केलेल्या मल्याळम् चित्रपटाबरहुकूम सेतुमाधवन् यांनीच हिंदूीतही केला होता. ‘यही है  जिंदगी’ (१९७७) हाही, मूळ तमिळ चित्रपटावरून त्यांनीच बेतला होता. पण या दोन हिंदूी चित्रपटांचा अपवाद वगळता सेतुमाधवन् प्रामुख्याने मल्याळम्, त्याखालोखाल तमिळ, सटीसामाशी तेलुगू आणि अपवादाने कन्नड अशा दाक्षिणात्य भाषांतच चित्रपट बनवत राहिले. १९५० चे दशक हा मल्याळम् आणि तमिळ भाषांत कथा कादंबऱ्यांच्या नव्या प्रवाहांचा काळ. त्याची नस सेतुमाधवन् यांनी हेरली आणि छापील नवसाहित्यावर आधारलेले चित्रपट ते बनवत राहिले. त्यांच्या चित्रपटांतल्या समाजदर्शनाचे, वास्तववादाचे श्रेय एका अर्थाने, त्या त्या भाषांतील साहित्यिकांचेही आहे. मात्र निव्वळ आधार चांगला असून भागत नाही, चित्रपटही चांगलाच बनवावा लागतो आणि दिग्दर्शकाचेच कसब त्याकामी पणाला लागते, हे त्यांनी तब्बल दहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून सिद्ध केले! सेतुमाधवन् यांची स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कारकीर्द १९६० ते साधारण १९९९ अशा उण्यापुऱ्या चार दशकांतली. एवढय़ा वर्षांत ६० चित्रपट त्यांनी केले. जीवशास्त्रातली पदवी घेऊन वयाच्या २० व्या वर्षी (१९४७ पासून) एएसए सामी, एलव्ही प्रसाद, अशा दिग्दर्शकांचे सहायक म्हणून काम करू लागलेल्या सेतुमाधवन् यांनी १९६० मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सिंहली भाषेत होता. मात्र पुढल्या वर्षभरात त्यांनी तीन मल्याळम् चित्रपट केले व पाचच वर्षांत, मल्याळमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. कमल हासन, माम्मूटी या अभिनेत्यांनी त्यांच्याकडे उमेदवारी केली होती. ज्यूली चित्रपटातील लक्ष्मी आणि विक्रम ही जोडीदेखील त्यांचीच देणगी. त्यांच्या निधनाने, वास्तववाद आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारा एक कलावंत हरपला आहे.