आयएनएस विराट या विमानवाहू नौकेसह आयएनएस निशंक, आयएनएस कोरा, मार्गदर्शित क्षेपणास्त्रधारी आयएनएस रणवीर विनाशिका यांचे समर्थपणे नेतृत्व करणाऱ्या अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार यांनी मंगळवारी भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. ३९ वर्षांच्या सेवेत त्यांनी सागरी मुख्यालयांसह प्रशासकीय, प्रशिक्षण विभागातील महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारतीय नौदलास अधिक प्रभावशाली करण्यासाठी हा अनुभव त्यांना निश्चितपणे कामी येईल. सध्याचा काळ आव्हानांनी भरलेला आहे. चीनच्या कुरापती वाढत आहेत. दक्षिण-चीन समुद्रात आक्रमक भूमिका घेणाऱ्या चीनचे हिंदू महासागरावर लक्ष आहे. भारतीय नौदलास दूरगामी विचार करून नियोजन करावे लागत आहे. नौदल प्रमुखपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी कुमार हे पश्चिमी मुख्यालयाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत होते. केरळमधील तिरुवअनंतपूरम हे त्यांचे मूळ गाव. १९८१ मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जे स्क्वॉर्डनमधून पदवी मिळवली. जानेवारी १९८३ मध्ये ते नौदलाच्या कार्यकारी विभागात दाखल झाले. पुढील काळात तटरक्षक दलाची सी ०१, नौदलाची विमानवाहू नौका, विविध युद्धनौकांचे नेतृत्व, पश्चिम मुख्यालयाच्या ताफ्याचे मोहीम अधिकारी म्हणूनही काम केले. नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाची जबाबदारी सांभाळण्याआधी ते आईडीएसच्या एकीकृत स्टाफ समितीचे प्रमुख होते. अमेरिकेतील नौदल महाविद्यालय, महू येथील लष्करी युद्ध महाविद्यालय, इंग्लंडमधील शाही महाविद्यालय येथे त्यांनी संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे. नौदलातील कामगिरीबद्दल त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

देशाचा ९० टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी मार्गाने होतो. हे मार्ग सुरक्षित राखण्याची जबाबदारी नौदलावर आहे. सध्या भारतीय नौदलाकडे १३० युद्धनौका, पाणबुडी, विनाशिकांचा ताफा आहे. पुढील पाच वर्षांत तो १७० युद्धनौकांपर्यंत विस्तारण्याचे लक्ष्य आहे. या नियोजनात तिसरी विमानवाहू नौकाही समाविष्ट करण्याचा विचार आहे. ही प्रक्रिया खरेदी, संपादनातील विलंबामुळे संथ आहे. तिला गतिमान करून भारतीय नौदलास सक्षम करण्यासाठी कुमार यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.