तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र व विज्ञान अशा अगदी वेगळ्या शाखांमध्ये एकाच वेळी पारंगत असणे ही तशी दुर्लभ गोष्ट, पण गोव्याचे खगोल वैज्ञानिक रिचर्ड डिसूझा यांच्याकडे ती आहे! अलीकडेच मिशिगन विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी असा शोध लावला की, आपल्या आकाशगंगेला एक भावंड होते. ती एक दीर्घिकाच होती, पण तिला शेजारच्या अँड्रोमीडा म्हणजे देवयानी या दीर्घिकेने २ अब्ज वर्षांपूर्वी गिळले. या संशोधनात रिचर्ड डिसूझा यांचा मोठा वाटा आहे. हा शोधनिबंध नुकताच ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला. दीर्घिका, त्यांचा जन्म, गुरुत्वीय बलाने होणारी ओढाताण, एकमेकांशी टकरी असा सगळा प्रवास या शोधनिबंधात मांडला आहे. देवयानीने इतर अनेक लहान दीर्घिका गिळल्या आहेत. संगणक सादृशीकरणाच्या माध्यमातून डिसूझा यांनी ती गिळली गेल्याचे स्पष्ट केले. जी दीर्घिका (गॅलॅक्सी) देवयानीने गिळली तिचे नाव ‘एम ३२ पी’. या शोधाला वेगळा अर्थही आहे, तो म्हणजे जेव्हा दोन दीर्घिकांची टक्कर होते तेव्हा त्याचा उरलेल्या दीर्घिकांच्या रचनेवर परिणाम होतो तसा तो आपल्या आकाशगंगेवर झाला असावा.

डिसूझा यांचे कुटुंब गोव्यात असले तरी रिचर्ड यांचा जन्म पुण्याचा. काही काळ कुवेतमध्ये राहून, १९९० मध्ये ते गोव्याला आले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात बीएस्सी, तर जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी केले. पुण्यात परत येऊन त्यांनी तत्त्वज्ञान व धर्मशास्त्रात पदवी घेतली. लुडविग मॅक्सिमिलन विद्यापीठातून त्यांनी खगोलशास्त्रात डॉक्टरेट केली. आता मिशिगन विद्यापीठात डॉक्टरेटनंतरचे संशोधन ते करीत आहेत त्यातच त्यांनी हा शोध लावला आहे. दीर्घिका, त्यांची वाढ, विलीनीकरण यावर डिसूझा यांचे संशोधन  आहे. सहा महिन्यांत हे संशोधन केल्याचे ते सांगतात. टक्कर वा विलीनीकरणानंतर दीर्घिकांच्या मूळ चकत्या कुठल्या बदलांतून गेल्या असाव्यात याचा अभ्यास यातून पुढे करता येईल. देवयानी व एम ३२ पी या दीर्घिकांच्या विलीनीकरणानंतर आता काही अब्ज वर्षांनी ‘मॅग्लानिक क्लाऊड’ या दीर्घिकेस गिळल्यानंतरही आपली आकाशगंगा सहीसलामत राहील असा याचा अर्थ आहे.

धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून विचारात व्यापकता आली, असे डिसूझा यांचे मत आहे. पुणे, बंगळूरु येथे खगोलशास्त्रातील सैद्धांतिक  अभ्यासावर भर आहे; पण निरीक्षणात्मक संशोधनासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल, असे ते सांगतात. धर्मशास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान यांची गल्लत न करताही काम करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.