उन्मुक्त कलाविष्काराला कल्पकतेची आणि अभ्यासाची जोड देत एका वेगळ्याच क्षेत्राची भारतातील आद्य संस्थापक म्हणून नावलौकिक मिळवण्याची किमया जेनी नौरौजी यांना साधली. भारतीय फॅशन  इतिहासात जेनी नौरोजी ही एक आख्यायिका ठरली आहे. फॅशन  डिझायनर्स, मॉडेल्स, रॅम्पवॉक या फॅ शनविश्वातील प्रचलित आणि वलयांकित संकल्पनांना एकत्र जोडणारी कला म्हणजे फॅ शन कोरिओग्राफी. नृत्य-संगीत-नाटय़ यांची जोड देत पोशाखकारांनी घडवलेले पोशाख लोकांच्या नजरेतून मनात उतरवणाऱ्या जेनी नौरोजी या भारतीय फॅ शन जगतात आद्य फॅ शन कोरिओग्राफर म्हणून नावाजल्या गेल्या. त्यांचे नुकतेच निधन झाले, मात्र त्यांनी निर्माण के लेल्या या अभिजात कलादिग्दर्शनाच्या परंपरेने फॅशन उद्योगात अढळ स्थान मिळवले आहे. फाळणीपूर्व भारतात कराचीत जन्मलेल्या जेनी नौरोजी यांनी लहानपणापासून बॅले नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. १९५४ साली विवाह झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या एका सामाजिक कार्यक्रमात बॅले नृत्य सादर करताना त्यांना कोणीतरी पाहिले आणि थेट फॅ शन शोचे दिग्दर्शन करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. तोपर्यंत भारतीय फॅशन जगताला पोशाखकारही (फॅशन डिझायनर)माहिती नव्हते, किंबहुना फॅशन उद्योगाची मुहर्तमेढही इथे झालेली नव्हती. सुरुवातीच्या काळात मिलमधून आलेले कपडे , साडय़ा लोकांना दाखवण्यापुरते काही स्त्री-पुरुषांच्या अंगावर चढवून सादर केले जात. मॉडेल नावाची संकल्पनाही तेव्हा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे के वळ फॅ शन शोचे दिग्दर्शन नव्हे तर मॉडेल घडवण्याचे श्रेयही जेनी यांच्याकडेच जाते. साठ -सत्तरच्या दशकांत जेनीच्या दिग्दर्शनाखाली फॅ शन शो करणाऱ्या अनेक तरुणी त्यानंतरच्या काळात मॉडेल्स म्हणून नावारूपाला आल्या. झीनत अमान, शोभा डे या त्यापैकी! संगीत आणि प्रकाशयोजना यांचे अचूक ज्ञान जेनी यांच्याकडे होते. संगीताचे सूर आणि प्रकाशाचा खेळ साधत निर्माण के लेल्या अवकाशात पोशाखकारांनी घडवलेल्या पोशाखाचे नाटय़ मॉडेल्सच्या मदतीने रंगवण्यात त्यांचा हातखंडा होता. मॉडेल्स म्हणजे कोणी निर्बुद्ध चेहरे नव्हेत, अंगावर चढवलेल्या पोशाखांतून उभे राहणारे व्यक्तित्व देहबोलीतून प्रकट करण्याचे कसब मॉडेल्सच्या अंगी असले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. अभ्यास आणि कलात्मक दृष्टी या दोहोंचा मेळ साधत स्वत:च जन्माला घातलेल्या कलेचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणून लौकिक मिळवणाऱ्याही त्या एकमेवाद्वितीय फॅ शन दिग्दर्शक ठरल्या.