जॉन मॅकअफी

गेल्या वर्षी ऑक्टोबरात त्याला अमेरिकेच्या विनंतीवरून करचुकवेगिरीप्रकरणी स्पेनमध्ये अटक झाली.

जॉन मॅकअफी

कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचे चांगला/ वाईट, सदाचारी/ दुराचारी, प्रामाणिक/ भ्रष्टाचारी असे सरळ वर्गीकरण करणे कधीच सोपे नसते. काळा-पांढरा यांच्यामध्ये अनेक राखाडी छटाही असतात. याचे सर्वाधिक चक्रावून टाकणारे ताजे उदाहरण म्हणजे जॉन मॅकअफी. संगणकात उच्छाद मांडणाऱ्या व्हायरसचा नायनाट करणारे जगातील पहिले व्यावसायिक. ‘अँटिव्हायरस सॉफ्टवेअर’ निर्माण करणारा गणितज्ञ, संशोधक.. ते करचुकवेगिरी, बदफैलीपणा, वादग्रस्त विधाने यांमुळे कुप्रसिद्ध झालेला फरारी उद्योगपती अशा चढउतारांनी भरलेला जॉन मॅकअफीचा जीवनप्रवास बार्सिलोनाच्या एका तुरुंगात अखेर संपला. मृत्यूनंतर काहींनी त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासांची उकल ‘कवी वा संगीतकाराइतका  विक्षिप्त संगणकतज्ज्ञ’ अशी केली आहे.

खरेतर ‘मॅकअफी असोसिएट्स’ ही अँटिव्हायरस कंपनी जॉनच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण. गणितात डॉक्टरेट मिळवून नासा, जनरल इलेक्ट्रिक, सिमेन्स यांसारख्या कंपन्यांत ऐन उमेदीत नोकरी केल्यानंतर अमेरिकेची सर्वात मोठी संरक्षण कंत्राटदार कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टीनमध्ये जॉनने आवाजावरून व्यक्ती ओळखणाऱ्या प्रोग्रॅमवर काम सुरू केलं. ते सुरू असतानाच १९८७च्या दरम्यान त्याच्या डोक्यात संगणकीय व्हायरसना अटकाव करणाऱ्या सॉफ्टवेअरची कल्पना आली आणि ‘मॅकअफी असोसिएट्स’चा जन्म झाला. तोवर या सॉफ्टवेअरचे व्यावसायिक मूल्य काहीच नव्हते. जॉन मॅकअफीच्या सॉफ्टवेअरने गडगंज पसरलेल्या अँटिव्हायरस उद्योगाचा पाया रचला. या कंपनीने जॉनला अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण तरीही अवघ्या सात वर्षांत जॉनने या कंपनीतील सर्व हिस्सा विकून त्यातून अंग काढून घेतले. तेव्हापासून मृत्यूपर्यंत जॉनने ‘मॅकअफी’ अँटिव्हायरसच्या विरोधात सातत्याने मोहीम चालवली.. हे त्याच्या लहरी वृत्तीचे केवळ एक लक्षण! हाती आलेला पैसा आणि प्रसिद्धी यांच्या जोरावर त्याने इतके भलेबुरे उद्योग केले की नंतरच्या काळात ‘अँटिव्हायरस’चा निर्माता ही त्याची ओळख मागे पडली. अल्पवयीन मुलींशी शरीरसंबंध, अमली पदार्थाच्या कायदेशीर दर्जाचा पुरस्कार, करबुडवा उद्योगपती अशी बिरुदे त्याच्या मागे लागली. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीही त्याने एक-दोनदा प्रयत्न करून पाहिले. पण गेल्या वर्षी ऑक्टोबरात त्याला अमेरिकेच्या विनंतीवरून करचुकवेगिरीप्रकरणी स्पेनमध्ये अटक झाली. तेव्हापासून तो बार्सिलोना तुरुंगातच होता. २३ जून रोजी तेथील न्यायालयाने त्याच्या अमेरिकेकडे प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आणि त्याच दिवशी जॉनने आत्महत्या केल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच्या तिसऱ्या पत्नीने मात्र, अमेरिकी सरकारवर त्याच्या हत्येचा आरोप केला आहे.  हे मृत्यूप्रकरण चर्चेत राहीलच. पण त्या बातम्यांपलीकडे त्याच्या संशोधनाची महती उरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: John mcafee profile mcafee dies in spain zws

ताज्या बातम्या