लालू इसू छिबा

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात ज्यांनी मोठी कामगिरी केली त्यात लालू इसू छिबा हे एक होते.

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात ज्यांनी मोठी कामगिरी केली त्यात लालू इसू छिबा हे एक होते. त्यांच्या निधनाने या स्वातंत्र्य चळवळीतील एक खंदा सेनानी हरपला आहे. विशेष म्हणजे ते मूळ भारतीय वंशाचे म्हणजे गुजराती होते. त्यांचा जन्म १९३० मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला, तेथेच ते लहानाचे मोठे झाले. १९५६ च्या देशद्रोहाच्या खटल्याने त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. नंतर ते ट्रान्सवाल इंडियन काँग्रेसमध्ये दाखल झाले. तेथून त्यांचा प्रवास दक्षिण आफ्रिकन कम्युनिस्ट पक्षाकडे झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ातील एमके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंडखोर सेनेचे ते प्लॅटून कमांडर होते. १९६३ मध्ये ते विल्टन मॅकवायी यांच्यानंतर या सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले. १९५६ मधील देशद्रोहाच्या खटल्यातील मॅकवायी हे एक आरोपी होते. त्यांच्यापासूनच छिबा यांनी प्रेरणा घेतली. १९६३ मध्ये छिबा व त्यांचे साथीदार असलेले सोली वानिया, इंद्रेश नायडू व शिरीष नानाभाई यांना रेल्वेमार्गावर घातपाताच्या प्रकरणात अटक करण्यात आली. मार्शल स्क्वेअर येथे नेऊन जाबजबाब घेताना त्यांचा छळ करण्यात आला त्यात त्यांचा एक कान निकामी झाला; पण तरी त्यांनी कुठल्याही गुन्ह्य़ाची कबुली दिली नाही, त्यामुळे आरोप ठेवता न आल्याने त्यांची सुटका झाली. यानंतर ते भूमिगत होऊन काम करीत राहिले. जुलै १९६४ मध्ये ते एमके सेनेत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्यासह बाबला सालूजी, पॉल जोसेफ, मॅक महाराज, स्टीव्ह नायडू व अमीन काजी हे सहकारी काम करीत होते. नंतर त्यांना पुन्हा अटक झाली तेव्हा त्यांना झोपेपासून वंचित ठेवण्यात आले. छळ केल्यानंतर त्यांची प्रिटोरिया मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली. लिटल रिव्होनिया खटल्यात त्यांना १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यासाठी त्यांना रॉबेन आयलंड येथील तुरुंगात टाकण्यात आले. त्या वेळी नेल्सन मंडेलाही त्यांच्यासमवेत होते. छिबा व मॅक महाराज यांनी त्या वेळी तुरुंगवासात असताना मंडेला यांचे ‘लाँग वॉक टू फ्रीडम’ हे आत्मचरित्र जगासमोर आणण्यात मोठी भूमिका पार पाडली. मंडेला यांचे हस्तलिखित छिबा यांना देण्यात आले व त्यांनी ते एका रात्रीत लघुलिपीत लिहून सगळा मजकूर एका पानात बसवला. नंतर महाराज यांनी ते बाहेर पोहोचवण्याची कामगिरी फत्ते केली होती. रॉबेन आयलंड येथून १९८२ मध्ये सुटका झाल्यावरही छिबा हे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये कार्यरत राहिले व त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे काम भूमिगत राहून चालू ठेवले. १९८५ च्या आणीबाणीत त्यांना साडेसात महिने तुरुंगात टाकण्यात आले होते. १९९४ व १९९९ अशा दोन्ही निवडणुकांत ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसकडून संसदेत निवडून आले. वंश, लिंगभेदाविरोधात त्यांनी जो लढा दिला त्यातूनच लोकशाही दक्षिण आफ्रिकेच्या घडणीस मदत झाली. त्यामुळे त्यांना ऑर्डर ऑफ लुथुली हा दक्षिण आफ्रिका सरकारचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यानंतरही जगातील इतरांना त्यांची स्वातंत्र्य प्रेरणा खुणावत राहिली. अहमद कॅथरडा हे त्यांचे मित्र व राजकीय गुरू होते. त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कॅथरडा फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. कॅथरडा यांच्या मार्चमधील मृत्यूनंतर छिबा हे खूपच व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांना आधार हरवल्यासारखेच वाटत होते. त्या धक्क्यातून ते अखेपर्यंत सावरले नाहीत. अत्यंत शांत, संयमी, मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ात लिटल रिव्होनिया खटला विशेष गाजला होता. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला कलाटणी मिळाली. त्यातील एक महत्त्वाचा दुवा छिबा यांच्या रूपाने निखळला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Laloo isu chiba personal life profile

ताज्या बातम्या