गर्भारपणात मलेरिया-डेंग्यूसारखे आजार होऊ नयेत याची कितीही काळजी घेतली, तरी ब्राझीलमध्ये २०१५ च्या मार्चपर्यंत जो मलेरियासारखाच रोग पसरला, त्यापासून अनेकजणी दु:खात लोटल्या गेल्या. हाही आजार डासांपासून होणारा, ताप आदी लक्षणांनंतर बरादेखील होऊ  शकणारा.. पण बाळंतिणीचा जीव या रोगातून वाचला तरी तिच्या बाळाचे डोके लहान दिसायचे. मेंदूची वाढच खुरटलेली असायची. हा विषाणू म्हणे १९५२ पासूनच माहीत होता.. पण हे काय नवीन? खुरटय़ा मेंदूची, छोटा चेहरा आणि डोके असलेली मुले जन्मण्याशी याचा काय संबंध? हे रहस्य उलगडण्याचे श्रेय, निर्विवादपणे शेरीफ झकी यांचे. अमेरिकेत, अ‍ॅटलांटा येथील ‘सीडीसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या केंद्रीय प्रयोगशाळेत प्रमुख विकृतीशास्त्रज्ञ म्हणून १९८८ ते २०१७ पर्यंत कार्यरत असलेल्या झकी यांनी या ‘झिका’ विषाणूचा हल्ला गर्भपेशींवर कसा होऊ शकतो, हे सप्रमाण शोधले. त्यांच्या त्या शोधाविषयीचा निबंध प्रकाशित करताना लॅन्सेटसारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय पत्रिकेने, ‘युरेका अ‍ॅलर्ट’ असा दर्जा त्या निबंधास असल्याची आरोळी दिली होती! केवळ झिकाच नव्हे तर अन्यही अनेक रोगविषाणूंचा नेमका ठाव घेणारे हे डॉ. झकी नुकतेच दिवंगत झाल्याची बातमी ‘सीडीसी’ने सोमवारी दिली.

शेरीफ झकी हे मूळचे इजिप्तचे. १९५५ सालच्या २४ नोव्हेंबरचा (योगायोगाने आजची तारीख!) त्यांचा जन्म. अलेक्झांड्रिया या भूमध्यसागरी बंदराच्या शहरात त्यांचे बालपण गेले. वैद्यकीय शिक्षणासाठी ते अमेरिकेत आले, एमडी आणि पीएच.डी. अशा दोन्ही प्रकारचे डॉक्टर झाले आणि विषाणूशास्त्र, विकृतीशास्त्र हे विषय शिकवू लागले. संशोधनाच्या आवडीमुळे १९८८ मध्ये ‘सीडीसी’त आले. कोविड आला तोवर ते निवृत्त झाले होते; परंतु त्याआधीच्या इबोला, सार्स, मर्स या रोगविषाणूंचे विश्लेषण त्यांनी केले, तसेच फार कमी प्रमाणात आढळणारे ‘लिम्फोसायटिक क्लोरिओमॅनेंजायटिस’सारखे रोगही त्यांनी शोधून काढले. अ‍ॅन्थ्रॅक्स या अमेरिकी राजकीय वर्तुळांत दहशत माजवणाऱ्या विषाणूचे विश्लेषण त्यांनी केले आणि झिकाच्या संहारक रूपाची ओळख त्यांच्याच संशोधनामुळे जगाला झाली. एकंदर ४०० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विषाणूंच्या अभ्यासासाठी उतीविश्लेषणाची संशोधनपद्धती त्यांनी रुळविली. निवृत्तीनंतर आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील व्याख्यानांची निमंत्रणे ते आवर्जून स्वीकारत. त्यांचे अवघ्या ६६ व्या वर्षी जाणे अकालीच, अशी हळहळ त्यांचे विद्यार्थी व सहकारी यांच्यात आहे.