मल्याळम नाटकांमध्ये अभिनेता म्हणून उत्तम कारकीर्द केल्यानंतर चित्रपटांतही नायक- सहनायकाच्या भूमिका नेदुमुडि वेणू यांनी केल्या. वयाच्या तिशीपासून ज्या पाचेकशे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या, त्यापैकी ते नायक असलेले चित्रपट असतील शेदीडशे. तीनदा त्यांनी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. साहजिकच, वयाच्या ७३व्या वर्षी वेणू यांचे निधन सोमवारी झाले, तेव्हा माम्मुटी, कमल हासनपासून अनेकांनी आदरांजली वाहिली. वेणुगोपाल के. पिल्लै हे त्यांचे मूळ नाव आणि नेदुमुडि हे त्यांचे गाव. आलपुळा (आलेप्पी) जिल्ह्य़ातल्या या गावी, १९४८ साली जन्मलेले वेणु जरी कथकलीतली आख्यान-नाटके पाहातच वाढले होते, तरी वास्तववादी पद्धतीने सादर केले जाणारे ‘नवे नाटक’ त्यांना अधिक खुणावू लागले. कवी आणि नाटककार के. एन. पणिक्कर यांच्या नाटय़ मंडळात ते सहभागी झाले. मल्याळम नाटकांचे प्रयोग, दौरे यांचा व्याप १९६०च्या दशकात मराठीइतका नव्हता, त्यामुळे नाटय़प्रयोगच केवळ न करता, भररस्त्यात ‘नव्या कवींच्या कविता’ वाचण्या-गाण्याचे कार्यक्रमही हे पथक करी. आवाजाला दमसास आणि फिरत ही दोन्ही देणी रस्त्याने दिली. पणिक्करांच्या नाटकांमध्ये ते प्रमुख भूमिकाही करू लागले. तिथून चित्रपटांत आले. जी अरविंदन यांचा ‘थंबु’ (१९७८) हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढल्याच वर्षीच्या ‘थाकरा’मध्ये निराळा नायक वठवून त्यांनी वाहवा मिळवली. त्यांचा काहीसा राकट साधासुधा चेहरा त्या भूमिकेला शोभला. पुढे १९८१च्या विडपरय्यम मन्पे या चित्रपटातली त्यांची भूमिका अजरामर म्हणावी अशी. हा चित्रपट हृषीकेश मुखर्जीच्या ‘आनंद’चा मल्याळम अवतार.. वेणु हे त्यातले कर्करोगग्रस्त, पण हसतमुख तरुण! पण म्हणून काही त्यांना ‘केरळचे राजेश खन्ना’ म्हणता येत नाही. तुलनाच करायची, तर डॉ. लागू यांच्यासारख्या भूमिका त्यांनी केल्या. ‘ओरु मिन्नैमिनुंगिंटे नूरुंगुवेत्तम’ या चित्रपटात पन्नाशीचा विवाहित शाळाशिक्षक अशी प्रमुख भूमिका त्यांनी वठवली. रोहिणी हट्टंगडी यांच्यासारख्या समर्थ अभिनेत्रीच्या साथीने ‘अच्युवेत्तन्ते वीडु’ (१९८७) या चित्रपटात स्वत:चे घर बांधण्यासाठी धडपडणारा मध्यमवयीन नायक त्यांनी साकारला. संयत अभिनय हे त्यांचे वैशिष्टय़ विनोदी भूमिकांत मात्र ‘शमीच्या झाडावर’ ठेवले जाई. त्यांच्या जाण्याने मल्याळम चित्रसृष्टीचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam film actor nedumudi venu profile zws
First published on: 15-10-2021 at 01:33 IST