गणित या एका विषयाने जितक्या विद्यार्थ्यांना शालेयानंदापासून तोडले असेल तितके ते समस्त अन्य विषय आणि शिक्षकगण यांनाही जमले नसेल. महाराष्ट्रासाठी ही बाब विशेष दुर्दैवाची. ज्या राज्याने देशास नव्हे तर जगास प्रा. केरोनाना छत्रे यांच्यासारखा गणिती दिला, त्या राज्यात आज गणिताची अवस्था केविलवाणी वा त्याहीपेक्षा अधिक वाईट आहे. यात बदल व्हावा अशी इच्छा बाळगून गणिताची लोकप्रियता वाढावी यासाठी अलीकडच्या काळात ज्यांनी मोलाचे प्रयत्न केले त्यांच्यात प्रा. सदाशिव गजानन देव यांचे नाव अग्रक्रमाने असेल. प्रा. देव यांचे नुकतेच निधन झाले. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतात त्यांच्या गणित या विषयातील योगदानाचा विस्तृत उल्लेख आलेलाच आहे. तो टाळून त्यांच्या कामाचे महत्त्व सांगायला हवे. संगीत, स्थापत्य, चित्र इतकेच काय, साहित्य, काव्य आदी एकही असा विषय नाही की ज्यात गणित नाही, असे सांगत प्रा. देव हे गणित आणि अन्य कला यांतील नाते उलगडून दाखवीत. ‘एखाद्या कादंबरीस खोली आहे/नाही, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात खोली ही गणिती संकल्पना असते’, ‘एखादा चेहरा आकर्षक असतो कारण त्यात सममिती असते. सममिती ही गणिती संकल्पना आहे’, ‘एखादे चित्र, काव्य वेगवान असते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात वेग ही गणिती संकल्पना आलेली असते’ अशा प्रकारच्या युक्तिवादातून प्रा. देव समोरच्याच्या मनात गणित या विषयाविषयी आधी ममत्व आणि नंतर प्रेम निर्माण करीत. आपली शिक्षणपद्धती गणित विरुद्ध अन्य विषय असे द्वैत निर्माण करते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे गणित उत्तम त्याची भाषा वाईट वा भाषेत ज्यास गती त्याची गणितात बोंब असे चित्र निर्माण केले जाते. याचा प्रा. देव यांस तिटकारा होता. त्यांचे प्रयत्न होते ही विभागणी कशी टाळता येईल, यासाठी. त्यासाठी आवश्यक तो अधिकार त्यांच्याकडे होता कारण संस्कृत आणि अर्थातच मराठी या दोन्ही भाषांवर त्यांची लडिवाळ हुकमत होती. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर गणित अध्यापन, गणिताच्या विविध रूपाबाबत आंतरराष्ट्रीय प्रकाशने असतानाही मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी काय काय करता येईल यावरही त्यांनी लेखन केले. त्या विषयावर त्यांचे पुस्तकही आहे. तसेच कोशवाङ्मय हादेखील त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ‘अलीकडे भारतात शुद्ध गणित शिकणारे फारच थोडे, सर्वाची ओढ उपयोजनाकडे’ अशी खंत एपीजे अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली होती. अशा वेळी गणिताची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रा. देव यांच्यासारख्यांचे जाणे अधिक दुर्दैवी ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathematical researcher dr sadashiv deo profile zws
First published on: 28-10-2021 at 01:03 IST