scorecardresearch

नादिया मुराद

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाची सदिच्छादूत म्हणून तिला नेमण्यात आले आहे.

नादिया मुराद
नादिया मुराद

ती अवघ्या तेवीस वर्षांची आहे. इराकमध्ये सिंजार प्रांतात १९९३ मध्ये जन्मलेली ती आता याझिदी वंश हक्क कार्यकर्ती आहे. तिचे नोबेल व साखारोव पुरस्कारासाठी नामांक न झालेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी तस्करीविरोधी विभागाची सदिच्छादूत म्हणून तिला नेमण्यात आले आहे.

तिचे नाव नादिया मुराद. इराकच्या या जिद्दी मुलीने जे साहस दाखवले त्याची तुलना करण्याच्या मोहात पडण्याचे कारण नाही, कारण तिची चित्तरकथा वेगळीच! आयसिसने तिचे अपहरण करून लैंगिक गुलामगिरीचे लक्ष्य बनवले होते. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने गुलाम बनवले. तिच्या घरातील सगळ्यांना ठार करून जिहादींनी तिची विक्री केली. नंतर ती जर्मनीला पळून जाण्यात यशस्वी झाली. तिची साहसकथा ऐकताना आजही शहारे येतात. नादिया मुराद १९ वर्षांची असतानाची ती गोष्ट. उत्तर इराकमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. ज्या याझिदी वंशाची ती आहे त्यांचे शिरकाण त्यांनी केले. तिच्या कुटुंबीयांसह ३०० याझिदींना त्यांनी मारले. नादियाला पकडून लैंगिक गुलामीच्या व्यापारात आणले, पण तिने सुटका करून घेतली. आयसिसने आतापर्यंत अनेक महिलांची हीच गत केली असून, अभिनेता जॉर्ज क्लूनीची पत्नी अमल क्लूनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची लढाई लढत आहेत. नादिया हजारो अत्याचारित याझिदी महिलांची प्रतिनिधी आहे. यापैकी अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले, खून करण्यात आले व काहींना लैंगिक गुलाम करण्यात आले. आज नादियाच्या चित्तरकथेने आयसिसचा हिणकस अमानुषपणा जगापुढे आला आहे. तिच्यासमोर तिच्या आठपैकी सहा भावांना ठार करण्यात आले. तीनशे पुरुष उपस्थित असताना आयसिसच्या दहशतवाद्यांनी नादियाला ताब्यात घेतले. अनेकांनी एकाच दिवशी तिच्यावर बलात्कार केले. तिच्या आईला ठार मारण्यात आले. नंतर दोन बहिणी व दोन चुलत बहिणी व पुतणी यांना आयसिसची पाशवी गरज भागवण्यासाठी मोसुलला पाठवण्यात आले. तीन महिने नादिया आयसिसच्या ताब्यात होती. नंतर ती तेथून सुटली व जर्मनीच्या आश्रयाला आली. मोसुलला नेताना तरुण मुलींवर बलात्कार करीतच नेले जाते, त्यांची छळवणूक केली जाते असे ती सांगते. दीडशे याझिदी कुटुंबीयांसह त्यांनी मला मोसुलला नेले. तेथे एक  माणूस म्हणजे हैवानच सामोरा आला. तो माझ्यावर बळजबरी करणार होता. माझी नजर खाली होती. मी घाबरले होते, पण नंतर वर पाहिले तर तो नरपशूच होता, असे नादिया सांगते.

‘आयसिसला संपवले नाही तर अमेरिकेचे काही खरे नाही,’ असा इशाराही ती देते. मानवी तस्करीत महिला-मुलांना ज्या यातनांतून जावे लागते, त्या यमयातना भोगलेल्या मुलीला सदिच्छादूत करण्याची कल्पना समर्पकच आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध ( Vyakhtivedh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nadiya murad

ताज्या बातम्या