सत्तरच्या दशकात गुगल नव्हते, माहितीचा विस्फोट झालेला नव्हता; कोलकात्यात बहुसांस्कृतिकतेचे वारे नुकतेचे कुठे सुरू झाले होते. त्या काळात सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम लोकप्रिय करणे हे तसे कठीण काम. पण विविध विषयांवर बेतलेले प्रश्न रंजक पद्धतीने सादर करून उत्तरानंतर उत्कंठा ताणून धरण्याची लकब, अगदी बारीक उच्चाराची किंवा स्पेलिंगची चूक असेल तर, मी तुम्हाला याचे पूर्ण गुण देतो असे औदार्य दाखवण्याचा दिलदारपणा, प्रश्न सोपा असो अवघड, तो सपकपणे कधीच न विचारणे, ही त्यांची वैशिष्टय़े होती. भारतात प्रश्नमंजूषा सादर करणारे पहिलेवहिले क्विझमास्टर नील ओ’ब्रायन यांची ही कहाणी. आता ते आपल्यात नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६७मध्ये नील ओ’ब्रायन यांनी कोलकाता शहरात पहिल्यांदा अगदी पद्धतशीर असा प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेतला. ठिकाण होते ख्रिस्ट किंग चर्च हॉल. खरे तर यात ते सादरीकरण करीत असत, प्रश्न काढण्याचे काम दुसरेच कुणीतरी करीत असे. साहित्य, भाषा, जागतिक इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांतील प्रश्न विचारताना ते नाटय़मयता आणत असत. अलीकडच्या ‘कौन बनेगा करोडपती’सारखे त्या वेळी त्याचे व्यावसायिकीकरण झालेले नव्हते.  नील यांनी त्यांच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय पुरातत्त्वशास्त्रातल्या सौविक गुहा व विमला जगन्नाथ यांचीही फिरकी घेतली होती; पण त्यात त्यांचा आविर्भाव कधीच कुणावर मात करण्याचा नसे. ते अँग्लो इंडियन प्रतिनिधी म्हणून खासदार व आमदारही होते.  तोच वारसा त्यांच्या मुलांनी पुढे नेला आहे. डलहौसी इन्स्टिटय़ूटच्या लॉनवर त्यांचे क्विझ कार्यक्रम होत असत; तेव्हा त्यांची चष्मा घातलेली, सडपातळ असलेली उंचीपुरी छबी अजूनही जुन्या लोकांना आठवत असेल. प्रश्न विचारताना त्यांचा आवाजातील चढउतार हा अभिनयाने मिळवलेला नव्हता, त्यामुळे त्यात सहजता होती. सीआयएससीई या अखिल भारतीय परीक्षा मंडळाचे ते अध्यक्ष होते. अँग्लो इंडियन समाजाच्या संघटनेचे ते काही काळ प्रमुख होते व फ्रँक अँथनी शाळा समूहाचेही धुरीणत्व त्यांनी पार पाडले.

त्यांचा जन्म १९३४ मधला. शिक्षण कोलकात्यात. झेवियरचा वारसा, प्रथमपासून वाचन व लेखनाची आवड, शिक्षणातील उत्तम कारकीर्द व विद्यापीठात अव्वल दर्जाने उत्तीर्ण अशी त्यांची ओळख. कोलकाता विद्यापीठातून ते इंग्रजी साहित्य विषयात एमए झाले होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे ते भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते. बंगाली माहितीकोश, क्विझ बुक्स, जनरल क्विझची १५०० पुस्तके, साहित्यावरील क्विझची १५०० पुस्तके त्यांच्या काळात प्रसिद्ध झाली.

त्यांनी ‘द एशियन एज’ व ‘द स्टेट्समन’ या दोन वृत्तपत्रांत स्तंभलेखनही केले.  त्यांचे पुत्र व तृणमूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन हेसुद्धा तितकेच चांगले क्विझमास्टर आहेत.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neil o brien
First published on: 11-07-2016 at 03:35 IST