एडमंड एच. फिशर

वयाच्या चौदाव्या वर्षी लुई पाश्चरच्या कार्याने प्रेरित झाले.

आपल्या शरीरात अब्जावधी पेशी असतात, त्यांच्या मदतीने सर्व क्रिया सुरू असतात. या पेशींचे कार्य व नियंत्रण कसे चालते याचे संशोधन पुढे नेण्यात एडमंड एच. फिशर हे आघाडीवर होते. त्यांना यासाठी ‘नोबेल’ही मिळाले होते. त्यांनी पेशींच्या क्रियेवर जो प्रकाश टाकला त्यामुळे कर्करोग, मधुमेह व इतर रोगांवर औषधांची निर्मिती करता आली. अलीकडेच वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. १९५० मध्ये ते सिअ‍ॅटेलमधील वॉशिंग्टन विद्यापीठात दाखल झाले, तेथे त्यांनी जैवरसायनशास्त्रज्ञ एडविन क्रेब्ज यांच्या समवेत काम केले. १९४७ मध्ये कार्ल तसेच गेरटी कोरी या (नोबेल विजेत्या) दाम्पत्याने, स्नायू आकुं चन पावतात तेव्हा त्यांना ऊर्जा कोठून मिळते, यावर काम करताना एका विकराचा शोध लावला होता. स्नायूच्या उतीत सापडलेल्या या विकरावर फिशर यांनी लक्ष केंद्रित केले. पेशींमधील फॉस्फेटचा समावेश आणि नष्ट होणे याने अनेक क्रिया घडतात, त्यांना फॉस्फोरिलेशन म्हणतात. पेशीतील अनेक क्रिया यामुळेच नियंत्रित होत असतात. कर्करोग कसा पसरतो याचा उलगडा यातून होतो. फॉस्फेटचा वापर हा विकरांच्या आधारे एखाद्या कळीसारखा करता येतो, असे फिशर तसेच क्रेब्ज यांनी सिद्ध केले. फॉस्फोरिलेशन क्रिया योग्य प्रकारे होत नाही तेव्हा कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेह यासारखे रोग होतात. त्यामुळे या संशोधनातून नवीन औषधे तयार करण्यास मदत झाली. विज्ञानात सुरुवात माहिती असते पण शेवटी आपण कुठे जाणार आहोत हे माहिती नसते, असे फिशर यांनी एकदा म्हटले होते. त्यांचा जन्म शांघायचा; पण ते स्विस बोर्डिग स्कूलमध्ये शिकले. वयाच्या चौदाव्या वर्षी लुई पाश्चरच्या कार्याने प्रेरित झाले. त्यांच्या वडिलांचे क्षय रोगाने निधन झाल्याने त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. १९५० च्या दशकात ते अमेरिकेत आले आणि पॅसाडेनातील कालटेकमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. १९६१ मध्ये ते प्राध्यापक झाले आणि अध्यापनकार्यातील निवृत्तीनंतरही त्यांनी जैवरसायनशास्त्रात काम चालू ठेवले. शंभरीतही त्यांनी त्यांचे कुतूहल कायम ठेवले होते. बालपणी पियानो वादक होण्याची आकांक्षा असलेले फिशर, उतारवयातही मोझार्ट, बिथोव्हनचे सोनाटा उत्तम वाजवीत. राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि पर्यावरण संरक्षण संस्था यांच्या निधीत कपात केल्यानंतर त्यांनी तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाविरोधातील मोर्चात भाग घेतला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nobel laureate edmond h fscher profile zws