रेडिओ लहरींच्या आधारे अवकाशाचा विनाअडथळा वेध घेणे यासाठी नोबेल मिळवणारे वैज्ञानिक अँटनी हेवीश यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी पल्सार म्हणजे स्पंदक ताऱ्यांचा शोध लावला होता. हे तारे स्फोट झालेल्या अतिनवताऱ्यांचे अवशेष असतात. डॉ. हेवीश यांनी रेडिओ दुर्बीण तयार करून पल्सारमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरींच्या माध्यमातून हा शोध घेतला. त्यासाठी त्यांना मार्टिन रायल यांच्यासमवेत १९७४चा नोबेल पुरस्कार मिळाला होता. डॉ. हेवीश यांनी पल्सारच्या शोधात निर्णायक भूमिका पार पाडली, या नोबेल समितीच्या वाक्याला त्या वेळी खगोल संशोधक फ्रेड हॉयल यांनी आक्षेप घेतला होता. कारण त्यांच्या मते जोसेलिन बेल यांनी नव्या दुर्बिणीच्या मदतीने या ताऱ्यांचा शोध आधीच लावला होता. जोसेलिन त्या वेळी अवघी २४ वर्षांची होती. तिचे संशोधन वरिष्ठांनी दडवून ठेवले असा आरोपही त्या वेळी डॉ. हॉयल यांनी केला होता. जोसेलिनने चांगले काम केले, पण ती तिचे काम करीत होती, असे हेवीश यांनी म्हटले होते. हेवीश यांचा जन्म ब्रिटनमधील कॉर्नवॉलचा. केम्ब्रिजमधून त्यांनी विज्ञानाचे शिक्षण घेतले. नंतर दुसऱ्या जागतिक महायुद्धात ते लढाऊ विमाने रडारपासून कशी वाचवायची या प्रकल्पात होते. त्या काळात क्वासार्स जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे म्हणून ओळखली जात होती. त्यांचे रेडिओ संदेश हे कमीअधिक होत असत. त्यासाठी हेवीश यांनी नवी रेडिओ दुर्बीण तयार केली होती. नोंदी घेण्यासाठी त्यांनी बेल हिची नेमणूक केली होती. या सगळ्यातून ४०० फूट कागद भरतील एवढे संदेश नोंदले गेले. हे संदेश परग्रहवासीयांकडून येतात असा जवळजवळ दोन महिने हेवीश यांचा समज होता. पण नंतर बेल हिने दुसरा स्रोत शोधून काढला. त्याचे स्पंदन वेगळे होते. कंप्रता वेगळ्या होत्या, त्यामुळे तो नवीन तारा असावा असा अंदाज बांधला गेला. हा सगळा डॉप्लर परिणामाचा भाग नाही, हे हेवीश यांना समजले होते. पल्सारबाबतचे संशोधन गुप्त ठेवण्यात आले. केम्ब्रिज रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी ग्रूप या संस्थेने ‘नेचर’मध्ये २४ फेब्रुवारी १९६८ रोजी शोधनिबंध प्रसिद्ध केला. फ्रँकलिन इन्स्टिटय़ूटने पल्सारच्या शोधाचे श्रेय बेल व हेवीश या दोघांना दिले होते. नोबेल समितीने मात्र पक्षपात केला. डॉ. बेल हिला नंतर या शोधासाठी ३० लाख डॉलर्सचा पुरस्कारही मिळाला. हेवीश रेडिओ खगोलशास्त्र या विषयाचे केम्ब्रिजमधील प्राध्यापक होते. १९७१-८९ या काळात ते मुलार्ड रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळेचे प्रमुख होते. ती संस्था राईल यांनी स्थापन केली होती. हेवीश यांनी लावलेला शोध आणि प्रत्यक्षात विद्यार्थिनीने त्याचा आधीच घेतलेला वेध यांतील वादामुळे ते कायम चर्चेत राहिले.