कवीच्या व्यक्तिमत्त्वात जितके म्हणून विरोधाभास असू शकतात, तितके सेज्माई कराकोच यांच्यात होते. कवी, स्तंभलेखक आणि ‘राजकीय पक्षनेते’ अशी ओळख असलेल्या सेज्माई कराकोच यांचे निधन मंगळवारी तुर्कस्तानची सांस्कृतिक राजधानी इस्तंबूल येथे झाले; तेव्हा हे विरोधाभासही त्यांच्यासह संपणार आणि तुर्कस्तानात यापुढे एकरंगी, एककल्ली, एकांगीच व्यक्तिमत्त्वांची सद्दी वाढत राहणार, अशी भीती त्या देशातील अनेकांना वाटली असेल!  हॉलिवूड व भारत यांच्याखालोखाल चित्रपट बनवणारा देश अशी तुर्कस्तानची ख्याती होती, वातावरण मोकळे होते, पाश्चात्त्य प्रभाव हा जगण्याचा नवा मार्ग म्हणून खुलेपणाने स्वीकारला जात होता, अशा काळात सेज्माई कराकोच घडले. पाश्चात्त्य आधुनिक वाङ्मय त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच वाचून काढले आणि अंकारा विद्यापीठातून १९५५ मध्ये, राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी मिळवली. ‘आधुनिक तंत्र हवे, पण इस्लामी सांस्कृतिक समृद्धीचे पडसाद या तंत्रातून उमटावेत’ असा आग्रह सेज्माई कराकोच यांनी धरला! त्यासाठी स्वत: कविता केल्याच, पण इस्लामी धर्मविचार आधुनिक कवितेच्या तंत्राने मांडण्यात चूक काय, असा वादही उपस्थित केला. यावरून कुणाला ते तद्दन धर्माध भासतील, पण रिम्बॉ किंवा गलेव्हिकसारख्या कवींना तुर्की भाषेत आणण्याचे महत्कार्य त्यांनी केले होतेच. १९६३ पासून ते स्तंभलेखन करू लागले. त्यांचे हे लेखन तुर्कस्तानातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी कधी ना कधी छापले आहे. त्यातून तरल, उत्कट, देशकाळाच्या सीमा झुगारणारे साहित्यप्रेम दिसे, पण ‘मुस्लीम असण्यात चूक काय?’ असा हेकेखोर सूरही डोकावे!

प्रस्थापित अमेरिकाधार्जिण्या तुर्क राजवटीविरुद्धचे ‘एकटय़ाचे बंड’ म्हणून कराकोच हेकेखोर वागले असावेत, असे मानण्यास जागा आहे. १९९० मध्ये त्यांनी ‘दिरलिश पार्टी’ या नावाने राजकीय पक्षही काढला! प्रचारचिन्हांत इस्लामी प्रतीकांचा लवलेशही नसलेला हा पक्ष म्हणे ‘तुर्क संस्कृतीची समृद्धी पुन:प्रस्थापित करणार’ होता. सलग दोन निवडणुकांत सहभागाची अट पाळली नसल्याने अल्पावधीत त्या पक्षाची मान्यताच रद्द झाली. पण दरम्यान, एदरेगान यांच्यासारखे नेते वाढण्यास सेज्माई कराकोच यांच्या हट्टीपणाचाही हातभार लागला. त्यांच्या सत्तेला कराकोच यांनी कधी पाठिंबा दिला नाही, पण एदरेगान व सहकारी सत्ताप्राप्तीनंतर त्यांना फार-फार मान देऊ लागले. ‘मोना रोसा’ हे अप्रतिम तुर्की प्रेमकाव्य याच कवीने लिहिले!  ‘कवी स्वयंप्रकाशी, स्वयंपूर्ण, समाधानी हवा’ असे नुसते न म्हणता तसे जगण्याचा आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्यवादी (पाश्चात्त्य) संस्कार त्यांनी नेहमीच जपला. ‘लैला मजनू’ची सुपरिचित  प्रेमकथाही त्यांनी अगदी आधुनिक शैलीच्या काव्याद्वारे सांगितली. त्यांच्या काव्यातील निसर्गाची वर्णने अद्भुतवादी (रोमँटिक) साहित्यपरंपरेतील असत. मात्र पाश्चात्त्य प्रभावाशी मांडलेला उभा दावा त्यांना दुराग्रहांकडे नेणारा आणि त्यांच्या हयातीत तरी त्यांची साहित्यिक उंची झाकोळणारा ठरला.