प्राजना चौथा

हत्तींशिवाय भारताची कल्पनाही करता येणार नाही.

हत्तींशिवाय भारताची कल्पनाही करता येणार नाही. हत्तींबाबत आतापर्यंत बरेच संशोधन झाले आहे, त्याच परंपरेतील संशोधिका प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब जाहीर झाला आहे. हत्ती या प्राण्याने माणसाचे जसे लक्ष वेधून घेतले तसेच काही ठिकाणी शेतीला उपद्रवही दिला आहे; पण तो साहचर्यातील दोषांचा भाग आहे असे त्यांचे मत आहे. आशियात सध्या ५० हजार हत्ती उरले आहेत, पण काही शतकांनी हत्ती पाहायला मिळतील की नाही अशीच परिस्थिती आहे.

प्राजना चौथा यांना पहिल्यापासून हत्तींमध्ये स्वारस्य आहे. हत्तींचा सहवास कधी पियानोच्या मैफलीसारखा तर कधी भयानक असतो असे टोकाचे वर्णन त्या करतात. दोन दशके त्या हत्तींवर संशोधन करीत आहेत. कर्नाटकातील नागरहोल येथे त्या पाच हत्तींबरोबरच राहतात, हिरव्यागार जंगलात त्यांचे वास्तव्य इतरांना हेवा वाटावे असेच. त्यांनी हत्तींशी नाते जोडताना आने माने फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. त्याचा उद्देश आशियायी हत्तींचे संवर्धन हा आहे. शब्दांशिवाय त्यांच्याशी संवाद साधता येतो, असे त्या सांगतात. ‘द ओल्ड एलिफंट रूट’ हा चित्रपट त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर हत्तींच्या स्थलांतर मार्गावर केलेल्या संशोधनावर चित्रित केला आहे. प्राजना यांचे वास्तव्य भारत, आफ्रिका व युरोपात असे होते. अनेकदा त्यांनी त्यांचे उद्योगपती वडील डी. के. चौथा यांच्याबरोबर जगप्रवासही केला. लंडन विद्यापीठातून त्यांनी मानववंशशास्त्र व कलाइतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली. कर्नाटकातील जेनू कुरुबा आदिवासींसमवेत काम करताना त्यांना हत्तींचे संशोधन करावेसे वाटले. जेनू कुरुबा जमातीतील लोक हे माहूतच जास्त आहेत. त्यांचे पती फिलीप गॉकीयर हे फ्रेंच असून त्या काही काळ फ्रान्समध्ये असतात. त्यांची सात वर्षांची कन्या ओजस तसेच हत्तींबरोबरचा सहवास यावर त्यांनी तयार केलेला माहितीपट फ्रान्सच्या टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यांची कन्या ओजस आधी मडिकेरी येथे शिकली; आता ती फ्रान्सला असते. आदिवासी लोकांचे हत्तींशी असलेले सहजीवन, पलाकप्पया नावाचे हत्तींचे डॉक्टर, हत्तींचे रामायणातील उल्लेख यांच्या आधारे त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. हत्तींबाबतची ती मार्गदर्शिका असून त्यात चित्रे व गोष्टी आहेत.  प्राजना या मोजक्या माहूत महिलांतील एक आहेत. त्यांनी केरळात हत्तींवरून सवारी व त्याला नियंत्रित करण्याचे शिक्षण घेतले. हत्तींशी मैत्री करूनच त्यांच्याशी हितगुज करावे लागते, तरुण पिढीला माहूत बनण्यात स्वारस्य नाही असे प्राजना यांना वाटत नाही. त्यांच्या मते मुलांना शाळा आवडत नाही, त्यांना हत्तींसोबतचे जीवनच आवडते. त्यांच्या संस्थेच्या प्रशिक्षण शिबिरात ४० तरुण माहुतांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. आशियन हत्तींचे जतन केले पाहिजे, अन्यथा ते नष्ट होतील, असे त्या सांगतात. भारत व म्यानमार या देशांत एकूण १६ हजार देशी हत्ती आहेत; त्यांच्या संवर्धनावर त्यांचा भर आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prajna chowta

ताज्या बातम्या