‘टांझानियात जन्मलेले’ अशी यंदा साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक अब्दुलरझाक गुर्ना यांची ओळख करून दिली जाते आहे खरी, पण ते जेव्हा जन्मले, त्या १९४८ साली ‘टांझानिया’ नावाचा देश जगाच्या नकाशावर होताच कुठे? हा देश जन्मला १९६४ साली, तेव्हाच्या ‘टांगान्यिका’ आणि ‘झांझिबार’ यांचे एकत्रीकरण झाले तेव्हा! त्याआधी झांझिबारमध्ये जनउद्रेक झाला होता आणि टांझानिया-निर्मितीनंतर तर अरब वंशीय आफ्रिकनांना परागंदा व्हावेसेच वाटू लागले होते, त्यांपैकी एक म्हणजे तेव्हा तरुण असलेले अब्दुलरझाक गुर्ना. तेव्हा ते लेखकबिखक नव्हते, पण इंग्रजीत शिकले होते आणि इंग्लंडमध्ये, कँटरबरी परगण्यातील केन्ट विद्यापीठात त्यांना प्रवेश मिळाला होता. याच विद्यापीठात पुढे ते शिकवू लागले आणि ब्रिटिश नागरिक झाले. इंग्रजीतच लिहू लागले. लघुकथा व कादंबऱ्या मिळून दहा पुस्तके त्यांच्या नावावर आहेतच, शिवाय समीक्षापर लेखनही त्यांनी केले आहे. ‘वसाहतोत्तर साहित्य’ हा अभ्यासविषय असल्याने सलमान रश्दी यांच्या साहित्य-संकलनाचे कामही त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठासाठी केले. सध्या ते केन्ट विद्यापीठातच सुप्रतिष्ठ प्राध्यापक आहेत.

नोबेल समितीने त्यांना पारितोषिक जाहीर करताना, ‘निर्वासितांचे विश्व साहित्यात आणून खंड आणि संस्कृती यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे, वसाहतोत्तर काळाचे प्रश्न अदम्यपणे मांडणारे’ अशा शब्दांत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. 

वसाहतोत्तर जाणिवांचे दर्शन व्यक्तिगत, भावनिक आंदोलनांतून घडवण्याची शैली त्यांच्या आधीच्या कादंबऱ्यांतून दिसते. यापैकी ‘मेमरी ऑफ डिपार्चर’चा अभ्यास अनेकांनी केला आहे. यातील नायक बऱ्याच वर्षांच्या खंडाने मायदेशी परततो, तेव्हा त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेले म्हणून आईने दुसरे लग्न केले आहे. नायक आता मध्यमवयीन, पण आईने त्याच्यासाठी तरुण मुलगी वधू म्हणून ठरवली आहे- आईला वाटते की आपला मुलगा अद्याप कुवारच असेल! या अशा प्रसंगांच्या गुंफणीतून झांझिबार-टांगान्यिका विलीनीकरणाचे वास्तव, त्यातील अनैसर्गिकता आणि म्हणून झालेली तगमग, याचे सूचक दर्शन गुर्ना घडवतात. आफ्रिकन, अरब नायकांच्या या कादंबऱ्यांना मोठा वाचकवर्ग मिळाला नाही, परंतु समीक्षकांनी आणि अभ्यासकांनी त्या नावाजल्या. अर्थात, ‘पॅराडाइज’ ही त्यांची कादंबरी ‘बुकर पुरस्कारा’च्या लघुयादीत आल्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचली. झांझिबारच्या बहुसांस्कृतिकतेचे संस्कार आपल्यावर झाल्याचे गुर्ना यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. भारतीय, अरब, आफ्रिकी अशा अनेकपरींच्या लोकांचा वावर या बंदर-बेटावर असे. एकारलेली संस्कृती हे पाश्चात्त्य देशांचे वैशिष्ट्य, असेही त्यांच्या कादंबऱ्या दाखवून देतात. सांस्कृतिक खुलेपणा आणि बंदिस्तपणा यांचे ठोकताळे देश-वंशागणिक बांधता येत नाहीत, आधुनिक/ वसाहतोत्तर काळात या धारणा व्यक्तीशी निगडित असतात, मात्र भोवतालामुळे त्यांचा कोंडमारा होऊ शकतो, हे सूत्र त्यांच्या लिखाणातून दिसले आहे.