स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात हवाई, नौदल आणि पायदळ अशा तीनही दलांत कार्यरत राहणारे एकमेव अधिकारी कर्नल पृथ्वीपालसिंग गिल (निवृत्त) यांचे चंडीगड येथे नुकतेच निधन झाले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संरक्षण दलात परीक्षा आणि प्रशिक्षणातील गुणवत्तेवर उमेदवाराची कुठल्या दलात नियुक्ती होईल, हे निश्चित होत असे. त्यामुळे अर्ज भरताना निवडलेला पर्याय त्याला मिळेलच, ही शाश्वती नसते. या व्यवस्थेत एका दलातून दुसऱ्या दलात संधी मिळण्याचा प्रश्न उरत नाही. भारतीय सैन्य दलांनी समन्वयाने काम करण्यासाठी मध्यंतरी सामरिक एकात्मिकीकरण विभागाची स्थापना झालेली आहे; परंतु त्यातदेखील परस्परांच्या दलात थेट काम करण्याची लवचीकता नाही. भारतीय लष्करातून निवृत्त झालेले गिल हे मात्र त्यास अपवाद ठरले. तीनही दलांत त्यांना कामाचा अनुभव मिळाला. १९२० मध्ये पतियाळा येथे जन्म झालेल्या गिल यांचे महाविद्यालयीन शिक्षण लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात झाले. आकाशात भरारी घेण्याची आवड त्यांना लाहोरच्या वॉल्टन एअरोड्रोममध्ये घेऊन गेली. वैमानिक म्हणून परवाना मिळाल्यावर १९४२ मध्ये त्यांची रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये नियुक्ती झाली. कराची हवाई तळावर हॉवर्ड विमानाद्वारे प्रशिक्षण सुरू झाले. पण त्यांनी विमानाचे सारथ्य करणे कुटुंबीयांना मान्य नव्हते. हवाई उड्डाण त्यांच्या कुटुंबीयांना असुरक्षित वाटत होते. त्यामुळे मग गिल हे हवाई दलातून रॉयल इंडियन नेव्ही अर्थात नौदलाच्या सेवेत गेले. आयएनएस तीर या पाणसुरुंगशोधक नौकेवर कार्यरत झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या नौकेने व्यापारी जहाजांना संरक्षण कवच पुरवले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गिल हे भारतीय लष्करात दाखल झाले. लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफांचे त्यांनी नाशिकच्या देवळाली कॅम्प स्थित तोफखाना केंद्रात प्रशिक्षण घेतले. त्यातून प्रशिक्षक (गनरी) म्हणून ते पात्र ठरले. ५.४ इंच होवित्झर तोफा भात्यात राखणाऱ्या ग्वालिअर माऊंटन बॅटरीत त्यांची नियुक्ती झाली. ३४ मीडियम रेजिमेंटनंतर त्यांनी ७१ मीडियम रेजिमेंटचे नेतृत्व केले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात गिल यांचा सहभाग होता. त्यांच्या तुकडीने शत्रूवर तोफगोळ्यांचा भडिमार केला होता. कर्नलपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी आसाम रायफलमध्ये काम केले. मणिपूर, उखरुल क्षेत्राची जबाबदारी सांभाळली. तीनही दलांत काम केलेल्या गिल यांनी १९७० मध्ये सेवानिवृत्ती स्वीकारली आणि पंजाबमधील फरिदकोट जिल्ह्यातील आपल्या गावी स्थायिक झाले. शेतीत रमले. वयाची शंभरी पार केलेल्या कर्नल पृथ्वीपालसिंग गिल (निवृत्त) यांची कामगिरी, अनुभव तीनही दलांसाठी प्रेरणादायी आहे.