डॉ. एस. कामेश्वरन

डॉ. एस. कामेश्वरन यांचा जन्म १९२३ चा. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण चेन्नईत व नंतरचे शिक्षण मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

‘डॉक्टर्स डे’ १ जुलै रोजी साजरा करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायाचे समाजाशी नाते वगैरे बरेच बोलले जाईल, पण  प्रत्यक्षात अशी उदाहरणे किती, असा प्रश्नही अनेकांना पडेल. डॉ. एस. कामेश्वरन यांच्यासारख्या डॉक्टरांनी मात्र त्यांच्या वैद्यकीय तज्ज्ञतेचा लाभ समाजाला करून देताना सामाजिक बांधिलकी जपली होती. अलीकडेच (२६ जून) वयाच्या नव्वदीत त्यांचे निधन झाले. ते देशातील एक प्रख्यात कान-नाक-घसातज्ज्ञ होते. जन्मजात बहिरेपणा किंवा इतर आजारांनी माणसाच्या ज्ञानचक्षूंनाच मर्यादा येतात परिणामी मुलांची सर्वांगीण प्रगती कमी होते. तमिळनाडूत बहिरेपणाचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे ०.६ टक्के आहे, याचे कारण म्हणजे राज्यातील सांस्कृतिक परिपाठामुळे समरक्त विवाह केले जातात. त्यातून श्रवणदोष व इतरही अनेक दोष निर्माण होतात, त्यामुळे अशा लोकांसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्रे चालवली. ज्या मुलांना जन्मजात बहिरेपणा आहे, त्यांना त्यांनी शस्त्रक्रिया करून दिल्यानंतर ऐकता येऊ लागले.  मुख्यमंत्री आरोग्य निधीतून अनेक मुलांवर त्यांनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या.

डॉ. एस. कामेश्वरन यांचा जन्म १९२३ चा. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण चेन्नईत व नंतरचे शिक्षण मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात झाले. नंतर त्यांनी ब्रिटनमधील एडिंबर्ग व ग्लासगो येथून कान-नाक-घसा याविषयक वैद्यकीय ज्ञान घेतले. त्यांना परदेशात राहून खोऱ्याने पैसे कमावता आले असते पण देशप्रेमासाठी ते भारतात परत आले. मद्रास वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान-नाक-घसा यांच्या रोगांवरील या विभागाचे प्रमुख या नात्याने त्यांनी कान-नाक-घसातज्ज्ञ डॉक्टरांच्या अनेक पिढ्या घडवल्या. माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांचे शल्यविशारद म्हणून, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. ‘पद्माश्री’ (१९९०) शिवाय त्यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारही (१९८१) मिळाला होता. प्रा. कामेश्वरन यांच्या पत्नी ललिता व मुलगा दोघेही डॉक्टरच आहेत. त्यांचे पुत्र डॉ. मोहन कामेश्वरन यांनाही २००६ मध्ये ‘पद्माश्री’चा मान मिळाला. एस. कामेश्वरन यांनी समर्पण वृत्तीने वैद्यकीय व्यवसायात काम करण्याची सुरू केलेली परंपरा पुढे नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Profile doctors day dr ent surgeon kameswaran akp