सैद्धांतिक भौतिकशास्त्रात पायाभूत काम करणाऱ्या वैज्ञानिकांत प्रा. थानू पद्मानाभन यांचा समावेश होता. त्यांच्या शोधनिबंधांमुळे ते जगभरातील खगोल वैज्ञानिकांत परिचयाचे होते. पद्मानाभन यांचे नुकतेच निधन झाले. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स म्हणजे आयुकामध्ये सुप्रतिष्ठ प्राध्यापक म्हणून अखेरपर्यंत ते कार्यरत होते. आयुकाच्या वर्तुळात ते पॅडी म्हणून सर्वपरिचित होते. विश्वरचना शास्त्र, पुंज भौतिकी, गुरुत्व यांसारख्या भौतिकशास्त्रातील अनेक विषयांवर त्यांनी संशोधन करून तीनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले ते आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले. विज्ञान व विज्ञानाचा इतिहास यांचा त्यांनी पुस्तकरूपाने वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांची पुस्तके समजण्यास सहज सोपी अशीच आहेत. जगातील वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनाचा सोळा हजार वेळा संदर्भ आजवर घेतला. त्यांनी चांगले विद्यार्थीही घडवले. एकूण १८ जण त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती झाले. डॉ. जयंत नारळीकर यांच्याबरोबर त्यांनी काम केले. सहज ओघवत्या भाषेत त्यांनी वैज्ञानिक संकल्पना अधिक सोप्या करून सांगण्याची नारळीकर यांची हातोटी त्यांनी शिकवण्यात वापरली. अनेक अवघड प्रश्नांची उकल करताना त्यांनी सापेक्षतावाद व पुंज भौतिकी यांची सांगड सैद्धांतिक पातळीवर घालण्याचा प्रयत्न केला होता. केरळ विद्यापीठाच्या किंग्ज युनिव्हर्सिटी कॉलेजमधून एम.एस्सी. पदवी घेतल्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम सुरू केले. नंतर डॉ. प्रा. जयंत नारळीकर त्या वेळी त्यांचे मार्गदर्शक होते. पुंज विश्वरचनाशास्त्रावर संशोधन करतानाच त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत १९८० मध्ये अध्यापन सुरू केले. १९९२ पर्यंत ते तेथे होते, पुढे ‘आयुका’साठी पुण्यात आले. आयसर मोहाली, आयसर पुणे, बेंगळूरुची रामन इन्स्टिट्यूट, अलाहाबादची हरिश्चंद्र रीसर्च इन्स्टिट्यूट येथेही त्यांनी अध्यापन केले. परदेशातील अनेक संस्थांत त्यांची व्याख्याने होत असत. त्यात प्रिन्स्टनचाही समावेश होता. २००७ मध्ये त्यांना भारत सरकारने विज्ञान व अभियांत्रिकी शाखेत पद्माश्री हा किताब दिला. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, इन्फोसिस विज्ञान पुरस्कार, बिर्ला पुरस्कार, गोयल पुरस्कार, इन्सा तरुण वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. पद्मानाभन यांनी २००९ ते २०१२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या विश्वरचनाशास्त्र विभागाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. ‘आफ्टर द फस्र्ट थ्री मिनिट्स : द स्टोरी ऑफ अवर युनिव्हर्स’, ‘स्ट्रक्चर फॉर्मेशन इन युनिव्हर्स’, ‘अ‍ॅन इन्व्हिटेशन टू अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या लोकाभिमुख पुस्तकांचा ठेवा त्यांनी आपणास दिला आहे.