‘बुकमार्क’ या इंग्रजी पुस्तकांच्या पानाऐवजी एखादे छायाचित्र नजरचुकीने या मजकुरासोबत  छापले गेले, असा (गैर)समज कृपया नसावा. छायाचित्रात पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जे ज्येष्ठ गृहस्थ दिसतात, तेच एडी जाकू आणि ‘हॅपिएस्ट मॅन ऑन अर्थ’- पृथ्वीतलावरील सर्वाधिक आनंदी पुरुष – हे त्यांनी स्वत:ला लावून घेतलेले विशेषण! ‘आनंदी कसे जगावे’ याविषयी त्यांचे मार्गदर्शन केवळ आप्तेष्टांना धीर देण्यापुरते न राहाता, ‘टेड टॉक’ पर्यंत पोहोचले होते… ऑशवित्झच्या छळछावणीत जिवंतपणी मरणयातना भोगलेला, कुटुंबीयही तिथेच गमावेला हा माणूस आनंदी कसा, याचे रहस्य त्यांच्या पुस्तकातून आणि भाषणांतून अनेकांना उमगले होते.  वयाच्या १०१ व्या वर्षी, १२ ऑक्टोबर रोजी एडी वारले… ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी अधिकृत सरकारी शोकसभा घेण्याचे जाहीर केले.

जर्मनीतील लाइप्झिग शहरात १९२० साली जन्मलेल्या एडींचे मूळ नाव अब्राहम (अदी) जाकुबोविझ. ते वयात येत होते, तेव्हा हिटलर हा जर्मनीचा भाग्यविधाता आणि ज्यू हे देशाचे शत्रूच, अशी खात्रीच बहुसंख्य जर्मनांना होत होती. कसेबसे- ज्यू ओळख लपवून- अभियांत्रिकीचे शिक्षण एडी यांनी पूर्ण केले, तोवर १९३८ उजाडले. त्या वर्षी जाकुबोविझ कुटुंबीयांची रवानगी हिटलरी छळछावणीत झाली. तरणे, कामगार म्हणून राबू शकणारे एडी एकटे वाचले, पण भाऊबहिणी, आई वडील सारे गेले. १९४५ साली, ऑशवित्झहून दुसऱ्या छावणीकडे रेल्वेच्या मालगाडीने नेले जात असताना एडी यांनी जंगलात उडी मारली. अन्नाविना, पाला खाऊन लपतछपत तीन आठवडे काढले. अखेर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी त्यांची सुटका केली. जर्मनीलगतच्या ऑस्ट्रियात राहू लागलेले एडी २६ व्या वर्षी विवाहबद्ध झाले, हे जोडपे हिंदी महासागर ओलांडून ऑस्ट्रेलियात आले आणि इस्रायलच्या निर्मितीनंतरही कॅनबेरा या ऑस्ट्रेलियन शहरातच राहिले. तिथे नोकऱ्या सांभाळून, पैसे जोडून निवृत्तीनंतर पतिपत्नींनी जमीनजुमला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दोन मुलगेही आता हाताशी आले होते. ‘पहिले मूल झाले, बाप झालो, तेव्हा मला मी आनंदी असल्याचा साक्षात्कार झाला’ असे पुस्तकात लिहिणाऱ्या एडी यांनी, तोवर आपणांस छळछावणीतील हालअपेष्टांच्या आठवणी छळत असत, अशी कबुली दिली आहे व यापैकी काही आठवणी लिहिल्याही आहेत.

एडी ऑस्ट्रेलियातील ज्यू समाजाला मदत करीत, पण पुस्तक लिहिल्यानंतर भाषणे हेच मोठे सामाजिक कार्य ठरले. २०१३ मध्ये ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा आपल्या ‘पद्माश्री’सदृश किताब एडी यांना देण्यात आला. सुखी, समाधानी राहणे हेच आनंदी असण्याचे मूळ मानणारे एडी अगदी साधेच बोलत. ‘मित्रांना घरी जेवायला बोलवा, एकमेकांना मदत करा, कुटुंबियांशी प्रेमाने वागा’ हेच त्यांचे सल्ले! ‘साध्या’ जगण्याचे मोल नेमके कळण्यासाठी मोठी किंमत मोजलेला हा माणूस आहे, हे त्यांचे अनुभव वाचताना/ ऐकताना उमगे आणि मग साध्या जगण्याची किंमतही वाचक वा श्रोत्यांना कळे. हे मोल जाणण्याची संधी यापुढेही पुस्तकरूपाने मिळत राहणार आहे. एडींचे जीवन हे त्या पुस्तकात सामावलेलेच आहे!