‘‘स्वप्न ते नव्हे, जे झोपल्यानंतर पडते, तर खरी स्वप्ने ती असतात, जी तुम्हाला झोपूच देत नाहीत,’’ असे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले होते. तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘‘आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका, ती सत्यात उतरतात!’’ अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकल्यानंतर आपल्या स्वप्नाविषयी शनिवारी रात्री न्यूयॉर्कच्या आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर १८ वर्षीय युवती एमा रॅडुकानूनेही उत्साहाने भाष्य केले. ‘‘हे एक संपूर्ण स्वप्न आहे! ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले, यावर विश्वासच बसत नाही. लहानपणी मी केवळ जिंकण्याचा.. आणि जिंकल्यानंतर आपल्या प्रशिक्षकांकडे धावत जाण्याचा विचार करायचे. मागील काही दिवस पुन्हा हेच विचार माझ्या मनात घोळत होते. आता जेतेपदामुळे चाहत्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढतील, याचे मला दडपण वाटत नाही. पण प्रत्येक विजयाचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करत आहे!’’ अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेतएमाला पात्रतेचा अडथळाही ओलांडण्याचीही खात्री नव्हती. त्यामुळे परतीचे तिकीट आधीच काढून ठेवले होते. पण तिने ‘न भूतो..’ असा पराक्रम दाखवत चक्क जेतेपद काबीज केले. या निमित्ताने तब्बल ४४ वर्षांनंतर ब्रिटनला ग्रँडस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीचा बहुमान तिने मिळवून दिला. १९७७मध्ये व्हर्जिनिया वेडने ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यामुळेच एमाची चर्चा अधिक झाली. एमाचा जन्म १३ नोव्हेंबर २००२ चा, टोरंटो (कॅनडा) इथला. तिचे वडील इयान रोमानियाचे, तर आई रेनी मूळची चीनमधली. वित्त क्षेत्रात नोकरी करणाऱ्या या भिन्नवंशीय दाम्पत्याची एमा ही एकुलती एक कन्या. सिमोना हॅलेप (रोमानिया) आणि लि ना (चीन) हे तिचे टेनिसमधील आदर्श. एमा दोन वर्षांची असताना हे दाम्पत्य नोकरीनिमित्त इंग्लंडला स्थलांतरित झाले. मग पाचव्या वर्षीपासूनच तिने टेनिस प्रशिक्षणाला प्रारंभ केला. लंडनमधील न्यूस्टेड वूड स्कूलमध्ये शिक्षण घेताना गणित आणि अर्थशास्त्रात ती हुशार विद्यार्थी होती. एप्रिल २०२१मध्ये तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु अभ्यासाव्यतिरिक्त विविध क्रीडा प्रकार आणि अन्य बरेच काही शिकायची तिला आवड होती. गोल्फ, कार्टिग, मोटोक्रॉस, स्कीइंग, घोडेस्वारी, नृत्य, बॅले यात ती रमायची. फॉर्म्युला-वन शर्यतींची एमा ही निस्सीम चाहती. वेगाचे हे वेड कारकीर्द घडवतानाही तिला उपयुक्त ठरले. २०१८मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. अँडी मरेचे सासरे निगेल सीअर्स हे आधीचे आणि अँडय़ू रिचर्ड्सन हे तिचे सध्याचे प्रशिक्षक. तिने पुण्यासह भारतामधील काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपली छापसुद्धा पाडली होती. दोन महिन्यांपूर्वी विम्बल्डन स्पर्धेत एमाला थेट प्रवेशिका मिळाली. याद्वारे तिने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारत लक्ष वेधले होते. त्यानंतर शिकागो येथील स्पर्धेत उपविजेतेपदामुळे एमा जागतिक टेनिस क्रमवारीत १५०व्या स्थानापर्यंत पोहोचली. पण जेतेपदानंतरच्या ताज्या क्रमवारीत तिने २३व्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटणारा एमाचा टेनिसप्रवास वास्तवात पुढे कोणती वळणे घेईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.