चारित्र्याशिवाय ज्ञानाला आणि ज्ञानी माणसाला मान नाही. म्हणून ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचा शेवट हा सुंदर चारित्र्य निर्मितीतच व्हायला हवा. कारण, हाच शिक्षणाचा मुख्य हेतू आहे आणि तो लक्षात घेऊनच शिक्षकाने शिकवले पाहिजे, हा विचार प्रा. मधुकर वाबगावकर यांनी अतिशय कौशल्याने स्वत:त रुजवला होता. डोक्यावर उडणारे काहीसे अस्ताव्यस्त केस. ढगळ पँट, पँटमध्ये खोचलेला पांढरा शर्ट, खांद्यावर घेतलेला कोट, हातात छत्री किंवा काठी अशी विद्यापीठातील पारंपरिक प्रोफेसरची प्रतिमा सार्थ करणारे वाबगावकर नुकतेच गेले. प्रा. वाबगावकर म्हणजे साहित्य, धर्मशास्त्र आणि प्राचीन भारताच्या इतिहासाच्या सखोल व्यासंगाचे जणू मूर्तिमंत प्रतीकच. एम.ए.च्या वर्गात कविता शिकविताना एखादा शब्द किंवा संकल्पना सांगता सांगता विद्यार्थ्यांना ते त्या संदर्भातील सर्व विश्वाची प्रदक्षिणा घडवून आणत. तोवर तास संपला असे. पण सरांचे शिकवणे संपूच नये असे विद्यार्थ्यांना वाटत राही. विद्यार्थ्यांशी वर्गाच्या बाहेरही संपर्क साधून अतिशय मायेने त्यांच्या घरादाराची, कुटुंबाची आणि त्याच्या अडचणींची चौकशी करून त्याला जणू आपल्या आयुष्याचा एक भाग करून टाकत.  वाबगावकर जसे व्यासंगी संशोधक होते तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षकही होते. वेगवेगळ्या विषयांचे व भाषांमधील हजारो संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. त्या संदर्भाचा भौगोलिक, सामाजिक, समाजशास्त्रीय संबंध ते शिकविताना उलगडून सांगायचे. व्यामिश्र वर्तमानात वेगाने बदलत जाणारे संवेदन मराठी कवितेत सशक्तपणे व्यक्त झाले. त्या बदलांची समीक्षा ही एक आव्हानात्मक बाब. परंतु वाबगावकरांनी हे आव्हान लीलया पेलले. संशोधन व चिंतन, संशोधन व समीक्षा, संशोधन व आस्वादन, प्राचीन मराठी वाङ्मयकोश, हे त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. वाबगावकरांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ ला नागपुरात झाला. दहावीत प्रांतातून ते प्रथम श्रेणीत तिसरे मेरिट आले. १९५४ ला नागपूर विद्यापीठातून बी.ए. झाले. १९५६ ला नागपूर विद्यापीठातूनच एम.ए. केले. १९५९ मध्ये नांदेड, जबलपूर येथे विद्यार्जन केले. याच वर्षी नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागात ते रुजू झाले. ३६ वर्षे येथे त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या मार्गदर्शनात १३ विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी मिळवली. ‘दै. तरुण भारत’मध्ये त्यांनी सदर लेखनही केले. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादक मंडळाचे ते काही काळ सदस्य होते. विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचेही काम त्यांनी पाहिले. त्यांच्या पुस्तकांना, त्यांच्या समाजाभिमुख कार्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. वाबगावकरांच्या जाण्याने विद्यार्थीप्रिय शिक्षक, व्यासंगी लेखक, आणि मराठी प्राध्यापकांच्या अनेक पिढय़ांचा संस्कारक हरपला आहे.