वडील राधानाथ रथ गेल्यानंतर जणू वारसाहक्कानेच ‘समाज’ या उडिया दैनिकाचे प्रमुख संपादकपद मनोरमा महापात्र यांच्याकडे आले. ही गोष्ट १९९८ सालची. परंतु साहित्यिक म्हणून पद्माश्री (२००९) आणि १९८४ सालच्या ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि महत्त्वाचे म्हणजे वाचकांचे प्रेम व समीक्षकांची दाद हे सारे त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवले होते. उडिया भाषेतील साहित्यात स्त्री-सक्षमतेची नवी मळवाट रुजवणाऱ्यांमध्ये त्या अग्रणी होत्या. कविता, लघुकथा आणि कादंबरी या तिन्ही प्रकारांतील त्यांची ४० पुस्तके आता, १८ सप्टेंबर रोजी झालेल्या त्यांच्या निधनानंतर, या कर्तृत्वाची साक्ष देत राहातील.

मनोरमा यांचा जन्म १९३४ सालचा. स्वातंत्र्य चळवळीत वडील सक्रिय असल्याने मुलीवरही नयी तालीम किंवाराष्ट्रीय शिक्षणाचे संस्कार झाले. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र त्यांनी रॅव्हेनशॉ कॉलेजातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. भारतीय विदेश सेवेतील (आयएफएस) पदारबिंद महापात्र यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर मनोरमा यांचे लेखन बहरले. २७ वर्षांच्या असताना त्यांचा पहिला कवितासंग्रह पुस्तकरूपाने आला. जुआरा जेउन्ती उठे (भरतीचे उधाण) असे त्याचे नाव. स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीने आदर्शवादाला भोळसटपणे न स्वीकारता प्रश्न विचारणाऱ्या बंडखोर प्रवृत्तीचे दर्शन घडवले, त्याचे प्रतिबिंब म्हणून या संग्रहाकडे पाहता येते. १९७९ सालचा त्यांचा बंद घरार कबाट (घराचे बंद दार) हा कथासंग्रह महत्त्वाचा ठरतो, तो त्यातील लघुकथांतून स्त्रीवादी हुंकार स्पष्ट उमटल्यामुळे. आई म्हणून दोन मुली व दोघा मुलांना वाढवताना, १९६७ पासून पाच बालपुस्तकेही त्यांनी लिहिली. समकालीन रशियन कवितांचा उडिया अनुवाद त्यांनी केला, त्या संग्रहाला सोव्हिएत लॅण्ड पुरस्कारही मिळाला. दीर्घ अवकाशानंतर १९९१ मध्ये त्यांचा अर्ध नारीश्वर हा पुढला काव्यसंग्रह निघाला, स्मृती चंदन आणि अमे सबु नीरब दर्शक हे कवितासंग्रह २००५ पर्यंत प्रकाशित झाले. या काव्यप्रवासात व्यक्तिवादी अस्वस्थतेतून समाजाला प्रश्न विचारण्यापासून ते स्त्रीवादी जाणिवेतून समाजधारणांना तपासून पाहण्याचा आणि त्याही पुढे, समाजाची दु:खे आकळून घेण्याचा प्रवास दिसतो. वाढत्या वयासह मनोरमा यांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांशी संबंध वाढत गेला. कटकमधील लोकसेवक युवा मंडळाच्या संस्थापकांपैकी त्या होत्या. बेघरांसाठी दयाश्रम, कुष्ठधाम, राज्याची महिला दक्षता समिती, ओडिशा साहित्य अकादमी, राधानाथ रथ न्यासाची स्थापना करून त्यामार्फत सुरू केलेले विज्ञान महाविद्यालय, असा त्यांच्या समाजकार्याचा पसारा होता. उत्तम वक्त्या अशीही त्यांची ख्याती होती.