स्वातंत्र्योत्तर कालखंडात बॅडमिंटन खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यात नंदू नाटेकर यांचा सिंहाचा वाटा होता. ‘ब्रिलक्रीम’च्या जाहिरातीत त्या काळी झळकणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यानेही या लोकप्रियतेची साक्ष दिली. एखाद्या अभिजात कलावंताप्रमाणे बॅडमिंटन कोर्टवर त्यांच्या फटक्यांची नजाकत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडायची. त्यामुळेच बुधवारी वयपरत्वे आजारपणामुळे १००हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावणाऱ्या नाटेकर यांनी ८८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, तेव्हा क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली. सदैव हसतमुख स्वभावाच्या मराठमोळ्या नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवली, तेव्हा या खेळाकडे फक्त तंदुरुस्तीसाठी योग्य खेळ म्हणून पाहिले जात होते. परंतु नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या नाटेकर यांनी १९५४मध्ये प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली. प्रकाश नाथ यांच्यानंतर ऑल इंग्लंड स्पर्धेत हा पराक्रम दाखवणारे नाटेकर हे दुसरे बॅडमिंटनपटू ठरले. परंतु पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे बॅडमिंटनपटू हा नाटेकर यांचा ठसा मात्र इतिहासात अजरामर राहील. नाटेकर यांचा जन्म १२ मे १९३३ या दिवशी महाराष्ट्राच्या सांगलीत झाला. शाळेत अभ्यासात रुची नसलेल्या नाटेकर यांना खेळाची मात्र अतिशय आवड होती. सुरुवातीला ते टेनिस खेळायचे. १९५१-५२मधील राष्ट्रीय कनिष्ठ टेनिस स्पर्धेत रामनाथन कृष्णनविरुद्धची अंतिम लढत ते हरले आणि त्यानंतर टेनिस खेळाला रामराम ठोकून बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी आणि खेळासाठीसुद्धा फलदायी ठरला. नाटेकर यांनी एकेरीत सहा राष्ट्रीय विजेतेपदे जिंकली. पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीमध्येही त्यांनी विजेतेपदावर नाव कोरले होते. मग १९५६मध्ये क्वालालम्पूर येथे झालेल्या सेलांगर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाटेकर यांनी विजेतेपद पटकावून इतिहास घडवला; कारण ते भारतीय बॅर्डंमटनपटूचे पहिले आंतरराष्ट्रीय यश ठरले. याशिवाय १९५१ ते १९६३ दरम्यान थॉमस चषक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्वसुद्धा केले. याशिवाय मीना शाहच्या साथीने १९६२मध्ये बँकॉकला झालेल्या किंग्ज चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील मिश्र दुहेरीचे विजेतेपदही त्यांनी पटकावले. याच स्पर्धेत पुढील वर्षी त्यांनी एकेरीचे जेतेपद प्राप्त केले. त्यामुळेच १९६१मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यास क्रीडा मंत्रालयाने प्रारंभ केला, तेव्हा ते पहिले निर्विवाद दावेदार होते. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारणाऱ्या नाटेकर यांनी १९६५मध्ये जमैका येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्तीनंतरही नाटेकर पेट्रोलियम कंपनीकडून वयोगटांच्या स्पर्धा खेळत राहिले. पेट्रोलियम क्रीडा मंडळाकडून ते सक्रिय कार्य करीत राहिले. १९८० व १९८१मध्ये ज्येष्ठांच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धाही त्यांनी जिंकल्या. मग १९८४मध्ये कॅनडा, तर १९८९मध्ये डेन्मार्कला झालेल्या जागतिक मास्टर्स स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते. १९९० ते १९९४ या कालावधीत नाटेकर यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षपद सांभाळताना राज्यात खेळाच्या प्रसारासाठी ठामपणे पावले उचली. वयाच्या उत्तरार्धात काही वर्षे ते गोल्फसुद्धा खेळले. ‘ब्रिलक्रीम’च्या जाहिरातीतील ते स्मित, अखेरपर्यंत कायम ठेवून नाटेकरांनी जगाचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile nandu natekar akp
First published on: 31-07-2021 at 00:14 IST