श्यामकांत जाधव

श्यामकांत जाधव हे या परंपरेचे पाईक आणि आजच्या अनेक चित्रकारांचे पहिले गुरू होते. २० डिसेंबरच्या रात्री त्यांचे  निधन झाले.

कोल्हापूर हे चित्रकलेतील एक संस्थान आहे आणि स्वत:ची निराळी परंपरा या संस्थानाने जपली आहे. तैलरंगातील व्यक्तिचित्रणात ‘डिट्टेल’- तपशील भरणारे इथले चित्रकार जलरंगात निसर्गाच्या किंवा शहराच्याही प्रवाही रूपाशी नाते जोडतात. श्यामकांत जाधव हे या परंपरेचे पाईक आणि आजच्या अनेक चित्रकारांचे पहिले गुरू होते. २० डिसेंबरच्या रात्री त्यांचे  निधन झाले.

वय ८७ होते तरी जाधव सरांचा उत्साह पाहण्यासारखा असे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत त्यांची प्रदर्शनेही भरली, त्यांमधील चित्रे कॅनडापर्यंतच्या खासगी संग्राहकांकडे आणि दिल्ली-मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातही (एनजीएमए) संग्रही राहिली. खुद्द जाधव यांनी संग्रह केला तो माणसांचा! लष्करी रुबाब असलेल्या पैलवानी व्यक्तिमत्त्वाने त्यांची छाप पडे; पण या दमदार देहयष्टीमागे हळुवार शिक्षकही होता. प्राथमिक शाळेपासून ते माध्यमिकपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवण्यात उमेदीची ३३ वर्षे जाधवसरांनी ‘घालवली’ नाहीत.. ही सारी वर्षे परंपरेचे सिंचन त्यांनी केले. बालकला हा कोल्हापूरच्या परंपरेपेक्षा निराळा प्रकार आहे, तो समजून घ्यावा लागेल आणि बालकलेच्या निकषांवर विद्यार्थ्यांमधील दृश्यभान ओळखून त्यांना पुढे तयार करावे लागेल, हे त्यांनी वर्षांनुवर्षे कृतीतून दाखवून दिले. शिक्षकी पेशाकडून ज्या नेतृत्वाचीही अपेक्षा असते, ती त्यांनी ‘रंगबहार’सारख्या संस्थेची स्थापना करून पूर्ण केली. रवींद्र मेस्त्री, भालजी पेंढारकर यांसारख्यांची प्रेरणा या संस्थेमागे होती. कित्येक महत्त्वाच्या चित्रकारांची प्रात्यक्षिके या संस्थेने आयोजित केली, संगीताचेही कार्यक्रम घडवून आणले. शिवाजी विद्यापीठात ‘चित्रतपस्वी आबालाल रेहमान आर्ट गॅलरी’ उभारण्याच्या कामाला चालना जाधवसरांनी दिली आणि पुढे विद्यार्थ्यांसह स्थापन झालेल्या ‘श्यामकांत जाधव कला प्रतिष्ठान’ला प्रेरणा दिली. त्यांचा कारकीर्द-गौरव दिल्लीच्या ‘आयफॅक्स’ या संस्थेने आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य कला प्रदर्शना’ने केला. परंतु हा चित्रकार म्हणून १९६८ पासून त्यांनी भरविलेल्या प्रदर्शनांचा गौरव होता. त्यांची सृजनशीलता चित्रचौकटीच्या बाहेर, शब्दांतूनही दिसे. विपुल कथालेखन त्यांनी केले. नंतरच्या काळात या लिखाणात खंड पडला तरी ‘रंग चित्रकारांचे?’ या पुस्तकातून ५० चित्रकारांची ओळख त्यांनी करून दिली. बाबुराव पेंटरांच्या स्मृतीसाठी ‘१६ जानेवारीनंतरचा रविवार’ या ठरल्या दिवशी होणारा ‘मैफल रंगस्वरांची’ हा त्यांनीच सुरू केलेला कार्यक्रम यंदा, जाधव यांच्याही  स्मृतींनी गदगदलेला असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Profile shyamkant jadhav akp