जपानमध्ये हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यापैकी हिरोशिमा येथील हल्ल्यात वाचलेले सुनाव सुबोई यांचे नुकतेच निधन झाले. हा हल्ला झाला तेव्हा सुबोई जेमतेम विशीत होते. अणुबॉम्ब पडला तिथून मैलभर अंतरावर ते होते. या हल्ल्यानंतर ते अण्वस्त्रप्रसारविरोधी मोहिमेचे बिनीचे शिलेदार बनले. जपानमध्ये अणुहल्ल्यातून वाचलेल्या लोकांचा एक गट निहोन हिदानक्यो नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे सुबोई हे सहअध्यक्ष होते. ६ ऑगस्ट १९४५ ची सकाळ कशी भयप्रद ठरली याचे वर्णन ते नंतर आयुष्यभर  करीत राहिले. त्या हल्ल्यात सुबोई हवेत फेकले गेले व नंतर बेशुद्ध झाले. त्यांचे सगळे शरीर भाजले गेले होते. गंभीर जखमी असलेल्या सुबोई यांची प्रकृती रुग्णालयातील उपचारानंतर सुधारली. पण त्यांच्या शरीरावरील अणुहल्ल्याच्या जखमा आणि त्याच्याशी संबंधित आजार कायमच त्यांच्यासोबत राहिले. सुबोई यांचा जन्म ५ मे १९२५ रोजी ओंडो या कुराहाशी बेटांवरील गावात झाला. हिरोशिमा कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ते शिकले. तिथे त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. हिरोशिमा हल्ल्यानंतर त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काही काळ काम केले. सुझुको एनोकी या त्यांच्या विद्यार्थिनीच्याच ते प्रेमात पडले होते. पण सुबोई लवकरच मरतील म्हणून तिच्या आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला आक्षेप घेतला. नंतर या दोघांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेवटी १९५७ मध्ये त्यांचा विवाह झाला. अणुहल्ल्यातून वाचलेल्या लोकांच्या कहाण्या ‘मेमरीज ऑफ हिरोशिमा अ‍ॅण्ड नागासाकी- मेसेजेस फ्रॉम हिबाकुशा’ या संग्रहात आहेत. त्यात सुबोई यांनी मांडलेली त्या हल्ल्याची भयानकता अंगावर शहारे आणणारी आहे. शिक्षक म्हणून काम करताना ते दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी अणुहल्ल्याची भयानकता मुलांच्या मनावर ठसवत. निवृत्तीनंतर त्यांनी जगभर प्रवास केला, अणुहल्ल्याच्या भयप्रद कहाण्या जगभरातल्या लोकांना ऐकवल्या. अमेरिकाभेटीत त्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या विमानांच्या प्रदर्शनावर टीका केली होती. ‘अणुहल्ल्यातून वाचलेले जगातील सर्वात क्रियाशील सदस्य’ असे त्यांचे वर्णन ‘द गार्डियन’ने केले होते. २०१६ मध्ये जपानला भेट दिली तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे सुबोई यांना आवर्जून भेटले. सुबोई यांनी अणुबॉम्ब हल्ल्यात जखमी झालेल्या सगळ्यांच्याच यातना ओबामा यांच्यासमोर मांडल्या. जपानभेटीत केलेल्या आपल्या भाषणात ओबामा यांनी कुठलीही नैतिक क्रांती अण्वस्त्रनिर्मूलनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले होते. जगातील अत्यंत विध्वंसक अशा हल्ल्याचा हा साक्षीदार पडद्याआड गेला असला तरी त्या कहाण्या व अण्वस्त्रांची भयानकता सतत जागती राहील.