‘अमेरिकन राजदूत असे पद मिळवणारी पहिलीच भारतवंशीय व्यक्ती’ ही सन २००९पासूनची विनय थम्मलपल्ली यांची ओळख; रास्त अभिमान वाटावा अशी! पण बराक ओबामांचे खंदे समर्थक असलेल्या विनय यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याही कारकीर्दीत, त्यापेक्षा महत्त्वाचे ठरणारे पद त्यांना नुकतेच मिळाले आहे. ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी’ (यूएसटीडीए) या यंत्रणेचे  प्रमुख कार्यान्वयन अधिकारी (सीओओ) म्हणून त्यांची नियुक्ती बायडेन यांनी केल्याचे मंगळवारी जाहीर झाले. जगभरातील विकसनशील देशांचा विकास अमेरिकी तंत्रज्ञान आणि अमेरिकी उत्पादने वापरून व्हावा, त्याद्वारे अमेरिकेतही आर्थिक संधी तसेच रोजगारसंधी निर्माण व्हाव्यात, हे उद्दिष्ट ‘यूएसटीडीए’च्या संकेतस्थळावर नमूद आहे. विनय थम्मलपल्ली यांनीही, देशसेवेची आणखी एक संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

नावाचे स्पेलिंग ‘व्हिनाइ’ अशा उच्चारासारखे करणारे विनय १९७४ मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत (कॅलिफोर्निया विद्यापीठ) आले आणि १९७७ मध्ये शिक्षण संपल्यानंतर इथेच राहू लागले. बार्बरा या त्यांच्या जोडीदारही अमेरिकन आहेत आणि त्या समाजकार्यही करीत असतात. हे दाम्पत्य डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक. ओबामांच्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची- विशेषत: तेलुगु भाषकांची भरघोस मते विनय यांच्या परिश्रमांमुळे मिळू शकली होती. अशा समर्थकांना  अध्यक्षांसह काम करण्याची संधी दिली जाते, त्यासाठी पाच तºहांचे पर्याय निवडण्यास सांगितले जाते आणि अंतिम निर्णय प्रशासनच घेते. विनय यांनी ‘राजदूतपद’ हा पाचवा पर्याय म्हणून निवडला होता. पहिला होता ‘यूएस-एड’ या विकाससंस्थेत काम करून भारत वा भारताहून कमी विकसित देशांतील गरिबांना मदत करण्याचा. पण त्यांना बेलीझ या मेक्सिकोच्या खालच्या कॅरिबियन देशाचे राजदूतपद मिळाले. हाही देश एकेकाळी ब्रिटिश अमलाखालचा, त्यामुळे मूळचा भारतीय म्हणून मला तेथे काम करणे अधिक सुकर झाले, हे विनय नमूद करतात. या पदानंतर ‘सिलेक्ट-यूएसए’ या अमेरिकी व्यापारयंत्रणेच प्रमुख कार्यान्वयन अधिकारीपदही त्यांच्याकडे आले. ट्रम्पकाळात मात्र त्यांनी वरुण निकोरे, फरहान हमीद, रीना शाह आदींसह स्थापलेल्या ‘रेडफोर्ट स्ट्रॅटेजीज’ या सल्लाकंपनीकडे लक्ष पुरविले. त्यांच्या ताज्या नेमणुकीमुळे भारतावर काही थेट परिणाम होणार नसला, तरी आंध्र प्रदेश व तेलंगण या दोन्ही तेलुगू भाषक राज्यांतील मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी विनय यांचे अभिनंदन केले आहे.