सैन्यदलांमध्ये बहुतेकदा यशस्वी म्हणवले गेलेले अनेक अधिकारी स्वभावाने बेधडक आणि काही बाबतींमध्ये बेफिकीर आढळून आलेले आहेत. साहस आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी अत्यावश्यक असा आत्मविश्वास या मंडळींकडे भरपूर आढळून येतो. हे साहस आणि जबाबदारी किंवा उत्तरदायित्व यांच्यातील समाजाने वा सरकारने आखून दिलेली सीमारेषा सहसा त्यांना कबूल नसते. नुकतेच ८१व्या वर्षी निवर्तलेले अमेरिकी नौदलातील अधिकारी रिचर्ड मार्सिन्को अशा अधिकाऱ्यांपैकी एक. हे व्यक्तिमत्त्व वादातीत नाही. नौदलातून निवृत्त होतानाच्या काळात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद झाले होते. काही काळ स्वारी तुरुंगातही जाऊन आली. परंतु ‘नेव्ही सील सिक्स’ हे अत्यंत सक्षम आणि धाडसी असे दहशतवादविरोधी पथक तयार करण्याचे श्रेय सर्वस्वी त्यांचेच. मार्सिन्कोने हे पथक घडवताना घेतलेले अपार कष्ट भविष्यात याच पथकाने ओसामा बिन लादेनचा खात्मा करताना आखलेल्या अत्यंत धाडसी आणि कल्पक मोहिमेत प्रत्यक्षात उतरलेले दिसून आले. आज कोणत्याही देशाच्या सैन्यदलात दहशतवादविरोधी अशी सक्षम यंत्रणा व नेतृत्व असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे काही पथक असले पाहिजे याविषयी दस्तुरखुद्द महाबलाढय़ अमेरिकेतच अनभिज्ञता होती. या अनभिज्ञतायुक्त फाजील आत्मविश्वासाला पहिला धक्का बसला इराणमधील अमेरिकी दूतावासाला १९७९मध्ये पडलेल्या वेढय़ानंतर. दूतावासातील ५२ अधिकारी व नागरिक जवळपास ओलीस ठेवले गेले आणि या कृत्याला इराणमध्ये त्या वेळी नव्याने स्थापन झालेल्या धर्मसत्तेचा पाठिंबा होता. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने हाती घेतलेली ‘ऑपरेशन ईगल क्ल़ॉ’ मोहीम अपयशी ठरली. या मोहिमेसाठी आवश्यक शीघ्रगतीने हालचाली करू शकेल अशा कमांडो पथकाची उणीव अमेरिकेला प्रकर्षांने जाणवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नेव्ही सील सिक्स’चा जन्म त्या घटनेनंतर झाला आणि त्या पथकाची सूत्रे नौदल अधिकारी रिचर्ड मार्सिन्को यांच्या हाती सोपवली गेली. ते दोन वेळा व्हिएतनाम युद्धासाठी जाऊन आले होते आणि तेथे त्यांनी यशस्वी मोहिमाही राबवल्या होत्या. कमांडो चकमकींविषयी त्यांच्या मनात काही प्रारूपे तयार होती. कमांडोंना प्रशिक्षण देणे, मोहिमा राबवताना यश संपादन करण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी मार्गदर्शन करणे याबरोबरीनेच या कार्यक्रमासाठी आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी प्रसंगी नौदलातील वरिष्ठांशीही दोन हात करण्यास मार्सिन्को कचरले नाहीत. लष्करातील डेल्टा फोर्स किंवा अमेरिकी मरिन्सपेक्षा नेव्ही सील्सना मिळणारी मदत सढळहस्ते होती. मार्सिन्को यांनी पुढे ‘रोग वॉरियर’ हे आत्मचरित्र लिहिले. व्हिडीओ गेम्स, युद्धपट यांसाठी पटकथा लेखन व मार्गदर्शन असले उद्योगही केले. पण त्यांची खरी ओळख नेव्ही सील्स युनिट सिक्सचे शिल्पकार अशीच राहिली. त्यांच्या दृष्टीने तीच त्यांच्या सर्वाधिक पसंतीची होती. आजही अमेरिका व इतरत्र नेव्ही सील्स हे नौदलाच्या अखत्यारीत असूनही दहशतवादविरोधी कारवायांमध्ये आदर्श पथक मानले जाते. रिचर्ड मार्सिन्को यांची ही पुण्याई अमिट म्हणावी अशीच.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seal team six founder richard marcinko zws
First published on: 01-01-2022 at 00:08 IST