इतिहास, पुरातत्त्वशास्त्र-पुराभिलेख या शास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना या क्षेत्रात आनंद नागप्पा कुंभार यांनी अतिशय मोलाचे कार्य केले. २७ मे १९४१ रोजी सोलापुरात एका गरीब, निरक्षर कुटुंबात जन्मलेल्या आनंद कुंभार यांच्या घरी पिढीजात कुंभारकामाचा व्यवसाय होता. छोटा आनंदही त्यात सगळी मदत करायचा. दिवसा वृत्तपत्रे टाकून त्यांनी रात्रशाळेतून शिक्षण घेतले. त्यांचे सहाध्यायी होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे! आनंद कुंभार तरुणपणी लष्करात तार खात्यात भरती झाले. तेथून परतल्यानंतर सोलापुरातील वीज वितरण केंद्रात लिपिक म्हणून काम पाहू लागले. त्या नोकरीत त्यांना अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली. ती करताना शेतशिवारात, गावच्या वेशीलगत उपेक्षित असलेली प्राचीन मंदिरे, मशिदी, उघडय़ावर पडलेली शिल्पे, शिलालेख पाहून कुंभार अस्वस्थ झाले आणि ते पुरातत्त्वशास्त्राच्या प्रेमात पडले.

त्यांना वाचनाचा छंद होताच; आता अनेक संशोधनपर लेख त्यांच्या वाचनात आले. विशेषत: महामहोपाध्याय वा. वि. मिराशींचे लेख वाचून कुंभार यांचे आयुष्यच बदलून गेले. डॉ. तुळपुळे यांनी संपादित केलेले शिलालेखांवरील अनेक ग्रंथ त्यांनी वाचून काढले, त्यांचा मनापासून अभ्यास केला. एक शिलालेख अभ्यासक, संशोधक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण यातून झाली. सोलापूर जिल्हा हे अभ्यास क्षेत्र म्हणून निश्चित केल्यानंतर त्यांनी जवळपास चारशे खेडय़ांना भेटी दिल्या आणि शंभरपेक्षा अधिक कानडी, मराठी आणि संस्कृत भाषेतील शिलालेख वाचले. त्यावर त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या ‘संशोधन तरंग’ या ग्रंथाला राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा १९८८ सालचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मिळाला होता. धारवाडचे प्राचीन पुराभिलेख विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास रित्ती यांच्यासमवेत ‘इन्स्क्रिप्शन फ्रॉम सोलापूर डिस्ट्रिक्ट’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचे सव्वाशेहून अधिक संशोधनपर लेख नामवंत नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. तन-मन-धनाने शिलालेखांच्या अभ्यासात स्वत:स झोकून देणाऱ्या कुंभार यांनी एका छोटय़ाशा, साध्या पत्र्याच्या घरात संसार केला. मात्र, तेथेच एका खोलीत जमवलेल्या सुमारे ७० हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदेमुळे ते घर म्हणजे ज्ञानभांडारच झाले आहे.

शिलालेख-संशोधनात आनंद कुंभार यांनी भरीव योगदान दिले. सोलापुरातील भीमा-सीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात आढळलेल्या मराठी शिलालेखावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळच्या बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंगच्या मंदिरातील मराठीतील शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजे फेब्रुवारी, १०१९ या काळात लिहिला गेला. ‘वाछितो विजेया हो ऐवा’ ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखात कुंभार यांनी शोधून काढली. मराठीत अस्तित्वात असलेला हा पहिलाच शिलालेख असण्याबाबत नंतर शिक्कामोर्तब झाले. साधी राहणी, काटक प्रकृतीचे कुंभार संशोधनात अखेपर्यंत रममाण होते. त्यांच्या निधनाने पुरातत्त्वशास्त्र आणि इतिहास या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.