श्याम सुंदर जानी

वायव्य राजस्थानातील १५ हजार खेडय़ांचा कायापालट जानी यांनी ही लोकचळवळ उभारून केला.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘लॅण्ड फॉर लाइफ अ‍ॅवॉर्ड’ या जमीन /माती संवर्धन विषयातील सर्वोच्च पुरस्कारासाठी यंदा सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह एकंदर १२ जण विचारार्थ होते. हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला, तो राजस्थानातील हवामान कार्यकर्ते श्याम सुंदर जानी यांना. जानी हे राजस्थानातील बिकानेर येथे समाजशास्त्राचे प्राध्यापक. त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कौटुंबिक वनशेती ही संकल्पना त्यांनी रुजवली. झाडांचे कुटुंबाशी नाते त्यांनी जोडून दाखवले व हरित कुटुंबे निर्माण केली. संयुक्त राष्ट्रांच्या ‘कन्व्हेन्शन टु कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन’ (यूएनसीसीडी) संस्थेची या वर्षीची संकल्पना आरोग्यकारक जमीन, आरोग्यकारक जीवन अशी आहे. ‘कौटुंबिक वनशेती’ ही संकल्पना जानी यांनी रुजवली. यात झाडांची काळजी घेण्यास कुटुंबांना शिकवण्यात आले. त्यांच्यात तशी जाणीव निर्माण करण्यात आली. वायव्य राजस्थानातील १५ हजार खेडय़ांचा कायापालट जानी यांनी ही लोकचळवळ उभारून केला. दुष्काळी गावे त्यांनी पुन्हा एकदा फुलवली. २५ लाख रोपे त्यांनी १५ वर्षांत लावली; ती झाडे जगवण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. याला ते ‘हरित सामाजिकीकरण’ म्हणतात. भारत-पाकिस्तान सीमेपासून २० कि.मी. अंतरावर असलेले गंगानगर हे श्याम सुंदर जानी यांचे मूळ गाव, थरच्या वाळवंटातले. पश्चिम राजस्थानातील वाळवंट हेच त्यांचे कार्यक्षेत्रही. तेथील वाळवंटीकरण रोखण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला. ब्रिटिश काळापासून पश्चिम राजस्थानात परदेशी प्रकारची झाडे लावण्यात आली. पण या झाडांचा वापर लाकूड व्यापारासाठी होत असल्याने त्यात मोठी उलाढाल आहे. जानी यांनी देशी वनस्पतींच्या प्रजाती तेथे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्याकडेही गावांना स्मार्ट करण्याच्या नावाखाली जी झाडे लावली जातात ती सगळीच आपल्या मातीतली नसतात तर विदेशी असतात. त्यामुळे अनेकदा, भूजलाची क्षारता वाढते. मातीतील पोषकता कमी होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जानी यांनी ही लढाई सुरू ठेवली आहे. डुंगर महाविद्यालयाच्या सहा हेक्टर परिसरांत त्यांनी तीन हजार झाडे लावली ती जो प्राणवायू सोडत आहेत त्याचीच किंमत सर्वोच्च न्यायालयाने प्राणवायूबाबत मांडलेल्या हिशेबानुसार आठ कोटी रुपये आहे, असे ते गमतीने सांगतात. त्यांचे हे कार्य त्यांच्याच भाषेत ‘हरित सलाम’ घेण्यास पात्र आहे.. कारण कुणीही भेटले की ते ‘हरित सलाम’ असे म्हणतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shyam sunder jyani profile zws

ताज्या बातम्या