स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणाऱ्या देशांत स्वीडन अग्रभागी. मात्र, या देशाला पहिल्या पंतप्रधान मिळायला २०२१ ची अखेर उजाडावी लागली. मॅग्डालेना अँडरसन नुकत्याच स्वीडनच्या पंतप्रधान झाल्या आहेत. आठवडय़ाभरात त्या दोनदा पंतप्रधानपदी निवडून आल्या. पहिल्या वेळी २४ नोव्हेंबरला निवडून आल्यानंतर अवघ्या सात तासांतच त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. अर्थसंकल्पावरून त्यांच्या सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या आघाडीतील ग्रीन पार्टीने सरकारचा पाठिंबा काढला. या औटघटकेच्या पंतप्रधानपदानंतर मात्र त्यांनी स्वबळावरच पंतप्रधान बनण्याचा निर्धार जाहीर केला आणि पुढच्या पाच दिवसांत त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. या नाटय़मय घडामोडींइतकाच त्यांचा इथपर्यंतचा प्रवासही विलक्षण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८३ मध्ये सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या ‘यूथ लीग’च्या सदस्य बनल्यावर पुढच्या चारच वर्षांत त्यांची या युवा आघाडीच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाली. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार आणि नियोजन विभागाचे संचालकपद सांभाळले. सुमारे तीन वर्षे त्यांनी स्वीडनच्या करसंस्थेच्या प्रमुख संचालकपदी काम केले. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून आल्या. तेव्हापासून सात वर्षे त्यांनी अर्थमंत्रिपद सांभाळले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या धोरण सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. गेल्याच महिन्यात त्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतेपदी निवडून आल्या. या पक्षाच्या नेतेपदी निवडून आलेल्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. आधी मोना साहलीन यांनी हे पद भूषविले होते. मात्र, स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरण्याचा बहुमान मेग्डालेना यांना मिळाला. अल्पमतातले सरकार चालविण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. गेली अनेक वर्षे सोशल डेमोक्रॅटिक पक्षाला साथ देणाऱ्या ग्रीन पार्टीने फारकत घेतली आहे. संसदेतील आठही पक्ष विखुरलेल्या स्थितीत आहेत. अशा वेळी, त्यांची मनधरणी करून मॅग्डालेना यांना विधेयके मंजूर करून घ्यावी लागतील. शिवाय, प्रतिस्पर्धी उजव्या पक्षांनी मांडलेल्या, मंजूर झालेल्या अर्थसंकल्पाची त्यांना अंमलबजावणी करावी लागेल. स्वीडनमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढील सप्टेंबरमध्ये होतील. तोपर्यंत सरकार टिकेल, पण सरकार चालवताना मॅग्डालेना यांची कसोटी लागेल. मॅग्डालेना यांची जलतरणपटू अशी ख्याती आहे. राजकीय अडथळ्यांचा प्रवाह पार करून त्या स्वत:ला कशा सिद्ध करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sweden s first female pm magdalena andersson zws
First published on: 03-12-2021 at 01:04 IST