सायरस होमी छोटिया

क्ष-किरण स्फटिकशास्त्र व जनुकीय सांकेतीकरणातून त्यांनी प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या रचना सोप्या पद्धतीने मांडल्या.

 

कुठल्याही ज्ञानशाखेत वर्गीकरणशास्त्र हा मूळ पाया असतो, त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या व सुलभ होतात. १९ व्या शतकापासून या शास्त्राचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू झाला, पण या शास्त्राचा वापर जैवरसायनशास्त्रात करण्याचा प्रयोग सायरस होमी छोटिया यांनी केला होता. ते जैवरसायनशास्त्रज्ञ होते. त्यांच्या या नवीन दृष्टिकोनातून रेणवीय जीवशास्त्राला नवा आयाम मिळाला. त्यांच्या निधनाने या शास्त्रातील गुंतागुंत सोडवणारा एक प्रयोगशील वैज्ञानिक हरपला आहे.

क्ष-किरण स्फटिकशास्त्र व जनुकीय सांकेतीकरणातून त्यांनी प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या रचना सोप्या पद्धतीने मांडल्या. जैवविविधताशास्त्रातील जागतिक संशोधनात वापरल्या जाणाऱ्या जैवमाहितीशास्त्रातील अनेक पायाभूत गोष्टी त्यांच्या संशोधनातून विकसित झाल्या. त्यांनी केंब्रिज येथे आर्थर लेस्क यांच्या समवेत केलेल्या संशोधनामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीच्या भात्यातील अस्त्रे असलेल्या अनेक प्रथिनांची रचना सोप्या पद्धतीने उलगडू शकली! प्रतिपिंडांची रचना व वर्गीकरण यात त्यांनी मोठे काम केले. त्यातून प्रतिपिंडावर आधारित उपचारपद्धती विकसित झाली. त्यांनी १९९२ मध्ये सुमारे १००० प्रथिन-समूह शोधून काढले. आज ५ लाख प्रथिने ज्ञात असून त्यांच्या वर्गीकरणाचे श्रेय छोटिया यांच्या मूलभूत संशोधनाला आहे. त्यांनी जैवमाहितीशास्त्रातही अतुलनीय काम केले, त्यासाठी त्यांना ‘डॅन डेव्हिड पुरस्कार’ही मिळाला होता. त्यांचा जन्म बर्कशायरमधील विंडसरचा, पण वडील होमी मूळचे मुंबईचे. हे कुटुंब १९३२ मध्ये ब्रिटनला स्थलांतरित झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विद्यावाचस्पती पदवी घेतली. त्यांनी असेटिलकोलिन या मेंदूतील संदेशवाहकावर संशोधन केले. येलमधील प्रयोगशाळा, इस्रायलमधील वेझमान इन्स्टिटय़ूट, फ्रान्सची पाश्चर इन्स्टिटय़ूट येथे भेटी देऊन त्यांनी प्रथिनांच्या वर्गीकरणाचे काम तडीस नेले. चित्रपट, स्थापत्यकला, अभिजात छायाचित्रकला, प्रवासवर्णन, छपाई तंत्र हे त्यांचे आवडते विषय होते, त्यावरील दुर्मीळ पुस्तके त्यांनी जमवली. त्यांचे काम हे केवळ विज्ञानाच्या एका शाखेपुरते मर्यादित होते असे म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या कार्यातून जैवविविधता शास्त्रही पुढे गेले. त्यांनी कधीच प्रयोगशाळा सोडावी लागेल अशी कामे हाती घेतली नाहीत. ते विज्ञान परिषदांनाही फारसे जात नसत. प्रसिद्धीपासून ते दूर राहिले. वयाच्या सत्तरीतही ते उमेदीने काम करीत होते. पण अखेर वृद्धापकाळापुढे कुणाचे चालत नसते त्यामुळे त्यांनाही मृत्यूने गाठलेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taxonomy in the biodiversity of proteins akp