सन १९१४ हे उत्पाती वर्ष होतेच, कारण त्या वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले. मात्र १९१५ पासून तुर्कस्तानने आर्मेनियातील लोकांची कत्तल सुरू केली, ती पहिले महायुद्ध संपल्यानंतरही १९२३ पर्यंत सुरू राहिली. ‘आर्मेनियन वंशविच्छेद’ म्हणून हा नरसंहार इतिहासात ओळखला जातो. या नृशंस कत्तलीला, त्यामागील अत्याचार आणि वेदना यांना अभ्यासपूर्ण, पुराव्यांनिशी लिहिलेल्या इतिहासात स्थान मिळवून देण्याचे पहिले प्रयत्न ज्यांनी केले, त्यांपैकी महत्त्वाचे नाव म्हणजे वहाकन दादरियान. विस्मृतीत गेलेल्या मानवी हक्क उल्लंघनाचा, त्यामागच्या दु:खांचा इतिहास मांडणाऱ्या या विद्वानाचे निधन २ ऑगस्ट रोजी झाले.

दादरियान हे वंशाने आर्मेनियन, पण अन्य देशांत वाढलेले, म्हणूनच १९२१ साली जन्म होऊनही ते संहारापासून वाचले. बर्लिन विद्यापीठातून गणित, व्हिएन्ना विद्यापीठातून इतिहास आणि झुरिक विद्यापीठातून कायदा या विषयांच्या पदव्या त्यांनी मिळविल्या. यापैकी कुठल्याच एका देशात स्थिर राहता न आल्याची खंत विद्यापीठीय अभ्यासापुढे फिकी पडली. पाठीवरले हे बिऱ्हाड दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जी ‘पळापळ’ अमेरिकेच्या दिशेने झाली, त्यात सापडून अमेरिकावासी झाले. शिकागो विद्यापीठातून समाजशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. मिळवताना, आधीच्या तिन्ही पदव्यांचा उपयोग झाला. आर्मेनियन वंशाचा अभ्यासच त्यांनी पीएच.डी.साठी केला होता. मात्र त्यात त्रुटी आहेत, हे त्यांना जाणवत होते. या त्रुटी भरून काढण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू ठेवले. अमेरिकी विद्यापीठांनीही त्यांना या कामी साथ दिली. १९७०च्या दशकापासूनच त्यांचे नाव, आर्मेनियाच्या- त्यातही तेथील विस्मृत नरसंहाराच्या- अभ्यासकांचे अग्रणी म्हणून घेतले जाई. येल व हार्वर्डसह अनेक विद्यापीठांत त्यांनी संशोधक-व्याख्यातापदी काम केले, अभ्यास क्षेत्रात नवनवे पुरावे शोधून इतिहासाचे निरनिराळे पैलू मांडणारे लेखन अनेक संशोधनपत्रिकांतून त्यांनी केले. १९९५ ते २०११ या काळात त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी ‘द हिस्टरी ऑफ द आर्मेनियन जेनोसाइड : एथ्निक कॉन्फ्लिक्ट फ्रॉम द बाल्कन्स टु अनातोलिया टु द कॉकेशस’ हे पुस्तक सर्वाधिक खपाचे ठरले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये १९९५ साली, आर्मेनियाचा नरसंहार या विषयावरील व्याख्याते म्हणून त्यांना खास पाचारण करण्यात आले होते. आर्मेनिया हा देश १९१८ मध्ये ‘स्वतंत्र’ होऊन सोव्हिएत रशियात विलीन झाला, पण १९९१ पासून पुन्हा स्वतंत्र अस्तित्व मिळालेल्या त्या देशाने, या अमेरिकावासी सुपुत्राला वेळोवेळी सर्वोच्च सन्मान आणि पदके देऊन गौरविले होते.