‘कविता लिहितो म्हणून मी आहे’ असे ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके म्हणतात, तेव्हा ते म्हणणे फक्त कवितेपुरते नसते. अभिव्यक्तीचा व्यापक पैस त्यामागे असतो. कवितांतून अभिव्यक्तीच्या या अस्तित्वखुणा पेरणाऱ्या डहाकेंना नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून उद्या- रविवारी पुण्यातील समारंभात तो वितरित करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आपल्या अस्तित्वाच्या तुकडय़ातुकडय़ांचे काम करीत, भाषेच्या सडसडण्याचा आवाज ऐकणे, याशिवाय दुसरे काहीच नव्हते करण्यासारखे..’ असे म्हणत डहाके साठच्या दशकापासून लिहिते आहेत. सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी त्यांना खरी ओळख मिळाली ती १९६६ साली.. ‘सत्यकथे’तल्या एका अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘योगभ्रष्ट’ या त्यांच्या दीर्घ कवितेने! साठच्या दशकातील अस्वस्थ तरुणाईच्या मनातील कल्लोळ टिपणारी ही कविता होती. आपल्या काळाविषयीचे काव्यात्म विधान करणाऱ्या त्यांच्या अशाच काही कवितांचा गुच्छ पुढे १९७२ साली ‘योगभ्रष्ट’ याच शीर्षकाने प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहामुळे तेव्हा सखोल सामाजिक भानाचा टोकदार आविष्कार मराठी कवितेत झाला. पुढे १५ वर्षांनंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘शुभवर्तमान’ आणि त्यानंतर दहा-दहा वर्षांच्या अंतराने आलेले ‘शुन:शेप’ व ‘चित्रलिपी’ आणि अगदी अलीकडचे ‘रूपान्तर’ व ‘वाचाभंग’ हे कवितासंग्रह असा त्यांचा कवितागत प्रवास आहे. आजूबाजूची राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि तिचा माणसावर होणारा परिणाम यांच्यातील द्वंद्व मांडणे हे डहाकेंच्या कवितेचे सूत्र राहिले आहे. वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते. म्हणूनच साहित्याचा आणि त्यामागील विचारव्यूहाचा साक्षेपी अभ्यास करणारे डहाके ‘दृश्यकला आणि साहित्य’ यांच्यातील संबंध तपासू शकतात.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant abaji dahake profile akp
First published on: 11-01-2020 at 02:26 IST