गालिब, इकबाल, अनीस, मीर, फिराक, फैज, खुसरो हे गतकाळातले तर अली सरदार जाफरी, शहरयार हे अलीकडचे उर्दू साहित्यकार म्हणजे या भारतीय भाषेची मानचिन्हे. त्यांच्या काव्याचे, विचारांचे टीकात्मक विश्लेषण हा जणू आगीशीच खेळ. हे आव्हान गोपीचंद नारंग यांनी नुसते स्वीकारलेच नाही तर या प्रतिभावंतांच्या कल्पनासागराचा तळ गाठून त्यांच्या प्रेरणांचे वास्तव वस्तुनिष्ठपणे वाचकांसमोर मांडले. हे नारंग परवा निवर्तले. त्यांच्या शेवटच्या श्वासासोबतच उर्दू साहित्यातील लेखन-समीक्षेचा एक सोनेरी अध्यायही इतिहासजमा झाला.

गोपीचंद नारंग यांचा जन्म (११ फेब्रुवारी १९३१) सध्याच्या पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतांच्या दुक्की इथला. वडील धरमचंद नारंग फारसी आणि संस्कृतचे विद्वान. हिंदु कुटुंबात जन्म झाला असला तरी रोजची व्यवहार भाषा उर्दूच होती. सिंधी समाजाची पंचांगेसुद्धा उर्दू लिपीतच निघत. नारंगांची कर्मभाषाही उर्दूच ठरली. फाळणी व स्थलांतरानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून उर्दूमध्ये एमए केले. शिक्षण मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीद्वारे उर्दू साहित्यात आचार्य पदवी मिळवली. दिल्लीचा उच्चभ्रूवर्ग घडवणाऱ्या ‘सेंट स्टीफन्स’ महाविद्यालयात ते उर्दू शिकवत. अमेरिकेच्या विस्कान्सिन, मिनेसोटा, मिनेपोलिस आणि स्वीडनच्या ओस्लो विद्यापीठातही त्यांनी अध्यापन केले. १९७४ मध्ये ते जामिया मिलिया इस्लामियाच्या उर्दू विभागाचे प्रमुख झाले.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

नारंग हे असे एकमेव उर्दू साहित्यिक होते ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील राष्ट्रपतींमार्फत सम्मान प्राप्त केला. १९९६-१९९९ पर्यंत दिल्ली उर्दू अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून व नंतर साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही भारतीय साहित्याला धोरणात्मक दिशा दिली.

नारंग यांनी उर्दू, हिंदी आणि इंग्रजीमध्ये विविध विषयांवर ५७ पुस्तके लिहिली. त्यांचे नाव अजरामर करणाऱ्या या पुस्तकांमध्ये ‘उर्दू अफसाना रवायत और मसायल’, ‘इकबाल का फ़न’, ‘अमीर खुसरो का हिंदूवी कलाम’, ‘जदीदियत के बाद’ यांचा विशेष वाटा आहे. अगदी आता-आतापर्यंत नारंग लिहीत होते. त्यांनी मागच्या काही वर्षांत मीर तकी मीर, गालिब आणि स्वत:च्या काही उर्दू गझलांचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. मूळचे ते कथाकार. त्यांचे समीक्षासंबंधित पुस्तक ‘फिक्शन शेरियात : तश्कील-ओ-तनकीद’ ( कथेचे शास्त्र : रचना आणि समीक्षा) मध्ये त्यांनी प्रेमचंद, मंटो, राजेंद्र सिंह बेदी, कृश्न चंदर, बलवंत सिंह, इंतिजार हुसैन, गुलजार, सुरेंद्र प्रकाश आणि साजिद रशीद यांच्या कथांचे विस्तृत विश्लेषण आहे. १९९० मध्ये पद्मश्री, २००४ मध्ये पदमभूषण, १९९५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार तर २०१२ मध्ये भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार, १९८५ मध्ये गालिब अवॉर्ड, २०११ मध्ये इकबाल सम्माननेही गौरविण्यात आले. याच वर्षी त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘सितार-ए- इम्तियाज या पाकिस्तानातील तिसऱ्या प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोपीचंद नारंग यांनी साहित्यातील धार्मिक कट्टरता आणि कंपूशाहीचा कायम विरोध केला. उर्दूला केवळ मुसलमानांची भाषा म्हणून हिणवणाऱ्यांना त्यांनी सप्रमाण दाखवून दिले की, उर्दू ही सद्भाव आणि माणसे जोडणाऱ्या सौहार्दाची भाषा आहे. दूरदर्शन आणि बीबीसीसारख्या प्रमुख माध्यम संघटनांनी त्यांच्या दुर्मीळ ध्वनिफिती आणि वृत्तचित्रे तयार केली. उर्दूचा वारसा कधीच का पुसता येणार नाही, हे गोपीचंद नारंग यांच्या पुस्तकांतून जगाला कळत राहील.